
खारघरकरांच्या सुरक्षेला धोका
खारघर, ता. १९ (बातमीदार) : आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना पोलिसांशी संपर्क साधता यावा, यासाठी एका खासगी कंपनीच्या माध्यमातून नवी मुंबई पोलिसांनी खारघरमध्ये चार ठिकाणी आपत्कालीन संपर्काची सुविधा आहे. मात्र, जनजागृतीअभावी सर्वसामान्य नागरिकांना याबाबतची माहितीच नसून मुख्य चौकातील एक कॉल बॉक्स बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
खारघरमधील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत नवी मुंबई पोलिसांना संपर्क साधता यावा, यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने खारघर रेल्वे स्थानक, सेंट्रल पार्क, हिरानंदानी आणि डेली बाजार येथे आपत्कालीन संपर्क सेवा बसवण्यात आली आहे. वर्दळीची ठिकाणे असलेल्या या ठिकाणांवरील डेली बाजार येथील कॉल करण्याची सुविधा सध्या बंद आहे. तसेच या कॉल बॉक्सविषयी सर्वसामान्य नागरिकांना माहितीदेखील नसल्याचे दिसत आहे.
--------------------------------------
जनजागृती करण्यात अपयश
रेल्वे स्थानक, हिरानंदानी परिसरात अनेक वेळा मारामारी, चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, खारघरमधील बहुतांश नागरिकांना पोलिसांना संपर्क साधण्यासाठीच्या या सुविधेविषयी माहिती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच दक्षता समितीच्या बैठकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
--------------------------
लाखोंचा खर्च वाया
विप्रो कंपनीच्या माध्यमातून हे इमरजन्सी कॉल बॉक्स खारघरमध्ये बसवण्यात आले आहेत. या चार बॉक्ससाठी एक लाखांहून अधिक रुपये खर्च झाल्याची माहिती विप्रो कंपनीच्या कामगारांनी दिली आहे.