
अनुसूचित जातींच्या मतांसाठी मोर्चेबांधणी
कामोठे, ता. १९ (बातमीदार) : केंद्र व राज्य सरकार अनुसूचित समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी विविध योजना राबवत आहे. पनवेल विधानसभा मतदार संघातील राजकारणावर अनुसूचित जातींचा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनुसूचित जातींमधील नागरिकांना भाजपसोबत एकरूप होण्यासाठी प्रयत्न केले जात असून पनवेल, कामोठे, खारघर येथील पक्ष कार्यालयात बैठकीचे सत्र सुरू झाले आहे.
पुरोगामी तसेच डाव्या विचारधारेच्या पक्षांकडून भाजपला सतत जातीयवादी पक्ष म्हणून हिणवले जाते; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनुसूचित जातीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देशभरात पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा रथ पोहचवला आहे. पनवेल महापालिका महापौरपद अनुसूचित जातीसाठी अडीच वर्षे राखीव असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी अनुसूचित जातीच्या एका महिलेला महापौर पदावर विराजमान केले होते. तसेच ग्रामीण भागातील अमित जाधव यांना जिल्हा परिषदेत पक्षप्रतोद पदाची संधी दिली आहे. याचबरोबर भाजप अनुसूचित मोर्चाने रायगड जिल्ह्यात अनुसूचित जातींमधील नागरिकांसाठी घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना राबवली आहे. याची माहिती समाजातील तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी भाजप अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदर यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती अभियान हाती घेतले जाणार आहे.