
गोवरचा प्रसार कमी पण, धोका कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : ऑक्टोबर महिन्यात थैमान घालणाऱ्या गोवरचा प्रसार सद्यःस्थितीत कमी झाला असला तरी धोका कायम आहे, असा इशारा टास्क फोर्सचे अध्यक्ष व माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी दिला आहे. दरम्यान, गोवरला रोखण्यासाठी लहान मुलांचे लसीकरणावर भर दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी आरोग्य विभागाला दिला आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत ऑक्टोबर महिन्यात गोवरचा उद्रेक झाला. मुंबईत गोवंडी परिसरात गोवरचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर मुंबईत गोवरबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत गेली. मुंबईत ६९ ठिकाणी उद्रेक झाला असून ३४९ प्रभागात फैलाव झाला होता. मुंबई सद्यःस्थितीत गोवरबाधित रुग्णसंख्या १४५ असून आतापर्यंत २३ लहान मुलांचा मृत्यू झाला. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गोवरबाधित रुग्णसंख्येत घट झाली असून रोज आढळणारी रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. गोवरबाधित रुग्णसंख्येत घट होत असली, तरी लहान मुलांचे लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत गोवरचा धोका कायम आहे, असे साळुंके यांनी स्पष्ट केले.
मुंबईत लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला असला तरी मालेगाव, भिवंडी, पुणे, नागपूर आदी ठिकाणी लसीकरणाला वेग आलेला नाही.
मुंबईत ९० टक्के लसीकरण
९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील ८४ आरोग्य केंद्रांतील एकूण २,३२,१५९ बालकांपैकी २,०९,८७१ (९०.४० टक्के ) बालकांना आजपर्यंत गोवर रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात आली.
५,११४ बालकांना शून्य मात्रा
६ ते ९ महिने वयोगटातील २३ आरोग्य केंद्रांतील ज्या ठिकाणी नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर पॉझिटिव्हचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा आरोग्य केंद्रातील एकूण ५,११४ बालकांना १०० टक्के गोवर रुबेला लसीची शून्य मात्रा देण्यात आली.