
शहापुरात काँग्रेसचे हात जोडो अभियान
शहापूर, ता. १९ (बातमीदार) : तालुक्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘हात से हात जोडो’ अभियानात राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेतील संदेश असणारी पत्रके जिल्हा परिषद गटनिहाय गावात वाटण्यात आली. महिला जिल्हा अध्यक्षा जान्हवी देशमुख यांनी वाढत्या महागाईने हैराण झालेल्या महिलांशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका आणि हात जोडो अभियानाचा उद्देश महिलांना सांगितला. हात जोडो अभियान शहापूर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त बुथवर राबवणार असल्याचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी सांगितले. शनिवारी (ता. १८) तालुक्यातील मांजरे जिल्हा परिषद गटातील डोहळेपाडा, पांढरीचा पाडा, मांजरे, बेलवली, साखरपाडा, ढाढरे, ढाढरेवाडी, डोंगरवाडी, उंबरवाडी, फणसवाडी या भागात हात जोडो अभियान राबविण्यात आले. या अभियानात पर्यावरण जिल्हा अध्यक्ष रामचंद्र जोशी, आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय बरोरा, आदिवासी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मुकणे, जयदीप देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.