अवयवदानासाठी प्रभावी जागृती आवश्‍यक

अवयवदानासाठी प्रभावी जागृती आवश्‍यक

सुनीता महामुणकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : कोरोनापूर्व कालावधीत अवयवदान प्रचार आणि प्रसारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर होता; मात्र आता मागील अडीच वर्षांत ही आघाडी मंदावली आहे. राज्य सरकार, रुग्णालये आणि सामाजिक संस्था यांच्या एकत्रित सहभागातून ही चळवळ अधिक प्रभावी होण्याची गरज सामाजिक संस्था व्यक्त करत आहेत.

‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ अशी मानसिकता तयार होणारा समाज निर्माण करण्यासाठी माणुसकीच्या जाणिवा आणि गैरसमजांच्या भ्रमातून बाहेर येणे आवश्यक आहे. व्यापक जनजागृती आणि अवयवदान हे जीवनदान हा संदेश सरकारी पातळीवर जनमानसांत रुजणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा द फेडरेशन ऑफ ऑर्गन एड बॉडी डोनेशन या शिखर संस्थेने व्यक्त केली आहे. मागील कित्येक वर्षे फेडरेशन ही मोहीम जनमानसांत रुजवण्याचे काम करते.

अवयवदान करण्याचा निर्णय हा प्रामुख्याने कुटुंबाच्या निर्णयावर अवंलबून असतो. त्यामुळे एकप्रकारे एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर त्याचे अवयवदान करायचे की नाही, हे त्याचे कुटुंबीय ठरवत असतात. हा निर्णय काही तासांत कुटुंबाला घ्यावा लागत असतो. यामध्ये वैद्यकीय मार्गदर्शन, कुटुंबाची आणि त्यांच्या समाजघटकांची साथ अत्यंत महत्त्वाची ठरते. आपल्या माणसाचा एखादा अवयव दान केला तर त्यामुळे दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीला जीवदान किंवा आशादायी जीवन मिळू शकते, ही भावना असेल तरच अवयवदान होऊ शकते. अनेकदा घरच्यांना त्यांच्या माणसाच्या मृत शरीरातील त्वचा किंवा पेशी तरी दान देण्याची इच्छा असते, परंतु संपूर्ण नातेवाईकांच्या सहमतीने याबाबत निर्णय घेणे, अद्यापही सहजशक्य नाही. यासाठी व्यापक जनमत तयार व्हायला हवे, असे फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या चाळीसहून अधिक सामाजिक संस्था, शेकडो कार्यकर्ते फेडरेशनशी संलग्न आहेत. नुकतेच संस्थेमार्फत फेब्रुवारीमध्ये नाशिक येथे अवयवदानावर दोन दिवसीय अधिवेशन घेण्यात आले होते. यामध्ये ६० वैद्यकीय महाविद्यालये आणि सुमारे दोनशे सक्रिय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अवयवदानासाठी काय हवे
नेत्रदान करण्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एक केंद्र असावे, जेथे प्रशिक्षित कर्मचारी असू शकतील. यासाठी प्रशिक्षण देण्याची सुविधा फेडरेशन उपलब्ध करू शकते. त्वचादान योग्य पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी रुग्णालयात यंत्रणा असायला हवी. तसेच देहदान करण्यासाठी संबंधित विभागातील वैद्यकीय महाविद्यालयात तशी सुविधा असायला हवी. सरकारने अशी सुविधा प्रत्येक जिल्ह्यात द्यायला हवी, असे मुद्दे या अधिवेशनात प्रामुख्याने मांडले गेले.

अवयवदान म्हणजे काय
जर रुग्णाचा मेंदू मृत झाला असेल आणि तसे सरकारी डॉक्टरांनी घोषित केले असेल तर त्याला अधिकृतपणा येतो. रुग्णालयामार्फत सरकारच्या संबंधित वैद्यकीय पथक रुग्णाची तपासणी करून यावर निर्णय देते. त्यानंतर रुग्णालय याची माहिती नातेवाईकांना देते. जर नातेवाईकांना अवयवदान करायचे असेल, तर ते त्याची माहिती देतात. मग पुन्हा सरकारची समिती त्याची नोंद करून अवयवदान केले जाते.

अवयवदानामध्ये रुग्णालयांची भूमिका महत्त्वाची असते, पण आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला तर अनेकदा ही बाब उघड केली जात नाही, कारण रुग्णालयावर ठपका बसू शकतो. अशा वेळी रुग्णालयांच्या आयसीयूचे ऑडिट व्हायला हवे आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा, असे पवार म्हणाले.

व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला तर नेत्रदान, त्वचादान आणि देहदान होऊ शकते. यामध्ये नातेवाईक निर्णय घेऊ शकतात आणि त्यानंतर नेत्रपेढी किंवा त्वचा बँक आदींशी समन्वय साधला जातो; मात्र ही प्रक्रिया मृत्यू झाल्यानंतर सहा तासांच्या आत पूर्ण होणे आवश्यक आहे.

रुग्णालयांची भूमिका महत्त्वाची
अवयवदान करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे, तसेच रुग्णालयांची भूमिकादेखील संवेदनशील असणे आवश्यक आहे. रुग्णाची शारीरिक अवस्था डॉक्टरांना माहिती असते. त्यामुळे दुर्दैवाने जर एखादा रुग्ण निधन पावला तर त्याचे सक्षम असलेले अवयव इतरांना हितकारक ठरू शकतात, याची अत्यंत संयमी आणि संवेदनशील पद्धतीने मांडणी रुग्णांच्या नातेवाईकांना देणे खूपच कठीण आणि हळुवार काम असते. त्याकरिता रुग्णालयात समुपदेशक असणे आवश्यक आहे.

जनजागृतीसाठी काय करायचे?
राज्य सरकारने अवयवदानाला प्रोत्साहन मिळेल अशा योजना राबवायला हव्यात. यासाठी वीज बिलापासून मृत्यू प्रमाणपत्रावर याबाबत एक रकाना ठेवावा आणि याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना द्यायला हवी. जिल्हा रुग्णालयात याबाबत यंत्रणा उपलब्ध व्हायला हवी. जळण्याच्या अनेक घटना घडत असतात. त्यामुळे त्वचा पेशी साठवणे हे पुन्हा जीवन मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हे सर्व समाजघटकांनी ओळखायला हवे, अशी मागणी संस्थांकडून केली जात आहे. लवकरच फेडरेशनमार्फत राज्य आणि केंद्र सरकारला याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com