
वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : कल्याण येथील शिवाजी चौकात शुक्रवारी रात्री एका वाहनाने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
शिवाजी चौकातील इमेज शोरुम दुकानासमोरुन शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता एक पादचारी पायी चालला होता. त्यावेळी भरधाव वेगाने एक वाहन चालक तेथून जात असताना त्याच्या निष्काळजीपणामुळे वाहनाची जोरदार धडक पादचाऱ्याला बसली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तोपर्यंत वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याने हवालदार मयूर तरे यांच्या तक्रारीवरून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पादचाऱ्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.