
थकीत संकुलांची नळजोडणी तोडली
माणगाव, ता. १९ (वार्ताहर) ः थकीत पाणीपट्टी, घरपट्टी कर भरणा करून माणगाव नगरपंचायतीला आपल्या शहरात नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन वारंवार करूनही थकबाकीदार दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. गुरुवारी (ता. १६) मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या आदेशानंतर पाणीपट्टी थकबाकीदार पाच गृहसंकुलांची नळजोडणी तोडण्यात आली.
दत्तनगर येथील आरोग्य बिल्डिंग, नानोरे रेल्वे स्थानकासमोर पल्लवकर संकुल, जुने माणगांव येथील तनजीन इमारत, कचेरी रोड येथील स्काय व्ह्यू अपार्टमेंट आणि जळगावकर कॉम्प्लेक्स या पाच संकुलात कारवाई करण्यात आली. माणगाव नगरपंचायतीकडून संबंधित थकबाकीधारकांना आधी नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही भरणा न केल्यामुळे कारवाई करण्यात आली. आणखी काही पाणीपट्टी व मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आल्या आल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.