
आवक वाढल्याने द्राक्षांच्या दरात घसरण
वाशी, ता. १९ (बातमीदार) ः वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत डिसेंबर-जानेवारीपासूनच द्राक्षांची आवक सुरू आहे; परंतु त्यावेळी द्राक्षे आंबट असल्याने मागणी कमी होती. आता उष्णता वाढायला सुरुवात झाल्याने गोड द्राक्षांची आवक बाजारात होत असून दररोज ३०-३५ गाड्या दाखल होत असल्याने दरांमध्येही घसरण सुरू झाली आहे.
जानेवारीमध्ये बाजारात द्राक्ष येण्याचे प्रमाण अधिक वाढते. साधारण नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान हा हंगाम सुरू असतो; परंतु यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या हंगामाला उशीर झाला आहे. अशातच सध्या असलेले उष्ण वातावरण द्राक्षाला पोषक वातावरण असल्याने दाखल होणाऱ्या गोड द्राक्षांना मागणी अधिक वाढली आहे. सध्या बाजारात नाशिक, तासगाव, सातारा आणि सांगलीमधून द्राक्ष दाखल होत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात सफेद द्राक्षांसाठी १० किलोला ५०० ते ८०० रुपये मोजावे लागत असून किरकोळ बाजारात प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांनी विक्री होत आहे.