मराठी भाषा चोराच्याही मनात ‘चांदणे’ ठेवते!

मराठी भाषा चोराच्याही मनात ‘चांदणे’ ठेवते!

आंतरराष्ट्रीय आनंद दिवस

विनोद आनंदाने जगण्याचा मार्ग दाखवतो!

अनेकांची आनंदाची व्याख्या वेगळी आहे. आपल्या काही साध्या साध्या गोष्टींतूनही इतरांना आनंद मिळतो. काहींचे लिखाण अनेकांना आनंदी बनवते. विनोदाची उधळण तर आनंदाची बरसताच करते... आजच्या ‘जागतिक आनंद दिवसा’निमित्त काही मान्यवरांनी रोजच्या जगण्याच्या धकाधकीतून सुखी राहण्याचा मूलमंत्र देत सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत...
--
मराठी भाषा चोराच्याही मनात ‘चांदणे’ ठेवते!
साध्या साध्या गोष्टींमध्येही मोठा आनंद असतो. रोजच्या जगण्यातल्या छोट्या गोष्टींकडे जरा वेगळ्या नजरेने पाहिले, की त्या आपल्याला वेगळ्याच दिसू लागतात. मी कवितेतून असे काही सांगू लागलो, की मग प्रेक्षक खळखळून हसतात. मी काही नवीन गोष्टी शोधून काढत नसतो. रोजच्या जगण्याच्या गोष्टीतील नाट्य-काव्य कवितेतून सांगतो. लोकांना ते सारे अद्‍भुत वाटते. त्यांच्या अनुभवाशी ते जोडले जाते आणि मग ते भरभरून दाद देतात. गॅसची दरवाढ, प्रदूषण, गर्दी इत्यादी रोजच्या जगण्यातील तिढ्यातून काही क्षण बाजूला होऊन ते एका वेगळ्या जगात प्रवेश करतात. लोकांना असा साधाच; पण निर्विष असलेला, कोणालाही न दुखावणारा आणि अश्लीलता नसलेला विनोद आवडतो. मग ते पोटभरून हसतात. विनोद माणसाला माणसाशी जोडतो. आता आपली भाषा किती काव्यमय आहे, हे सांगताना मी म्हणालो, की मराठी भाषा चोराच्या मनातही ‘चांदणे’ ठेवते. लोकांना ते फार आवडले. कारण हिंदीत ‘चोर के दाढी में तिनका’ असा वाक्प्रचार आहेच. मी माझ्या ‘माय’ कवितेत म्हटले आहे, ‘माय तू एकदा जन्म दिलास; पण आता तू रोज आमच्या पोटात शिरतेस भाकरी होऊन...’ किती साधे वाक्य आहे; पण ते लोकांना अमाप आनंद देते. रोजच्या जगण्याच्या कटकटीतून जरा बाजूला होऊन आपण साऱ्यांनी असा आनंद मिळवायला हवा. इतरांना वाटायला हवा. आनंद वाटला की मग तो आणखी वाढतो.
- अशोक नायगावकर, हास्यकवी

विनोद दुय्यम नाही!
आजच्या ताणतणावाच्या जगात विनोदाचे महत्त्व मोठे आहे. आनंदी, ताणवमुक्त जगणे औषधांनीही साध्य होत नाही ते हास्यविनोदाने होऊ शकते. सध्या सामान्य लोक विविध संकटांनी ग्रासलेले, आर्थिकदृष्ट्या अस्थिरतेने त्रस्त झालेले, विचित्र राजकारणामुळे वैतागलेले आणि कौटुंबिक ताणतणावामुळे हैराण झालेले आहेत. त्यामुळे रक्तदाब, मधुमेहासारखे आजारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तणावमुक्ती हा विनोदाचा मूलभूत गुण आहे. म्हणून विनोदाच्या माध्यमातून लोकांना हसत-खेळत ठेवले पाहिजे. विनोदाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तो एकटा नसतो. विनोदाला गर्दी लागते. मित्रमंडळी लागतात. या अर्थाने विनोद माणसे जोडतो. भरपूर मित्र असले, खूप सारी जवळची माणसे असली म्हणजे माणूस आनंदाने जगतो. मराठी साहित्यात ‘टवाळा आवडे विनोद’ असा दृष्टिकोन असल्याने विनोदाकडे दुय्यम म्हणून पाहिले जाते. विनोद दुय्यम नाही. चांगला विनोद हाही प्रतिभेचा आविष्कार आहे. आम्ही गावोगावी कविसंमेलने करतो तेव्हा आमचे सूत्रच असते, की हसवता हसवता बघ्यांना श्रोते, श्रोत्यांना वाचक आणि वाचकांना अंतर्मुख बनवणे. विनोद अंतिमतः तुम्हाला अंतर्मुख करतो. आनंदाने जगण्याचा मार्ग दाखवतो.
- रामदास फुटाणे, भाष्यकवी

आनंद शब्दात मांडण्यासारखी गोष्ट नाहीच!
आनंद ही व्याख्या करण्यासारखी किंवा शब्दात मांडण्यासारखी गोष्ट नाहीच. आनंद म्हणजे अनुभवण्याची गोष्ट. आनंद कोणत्याही वाण्याकडे किंवा दुकानात मिळत नसतो. तो मिळवणे इतके सोपे नाही, त्यासाठी आपल्या आजूबाजूला तशी परिस्थिती हवी. विशेष म्हणजे आनंद देण्याची किंवा घेण्याची नाही, तर वाटण्याची गोष्ट आहे. आपल्याला कधी आनंद मिळेल ते आपण सांगू शकत नाही. मला कोणत्याही गोष्टीतून आनंद मिळतो. कधी कधी मी स्वस्थ बसलेलो असलो किंवा कधी एखादा चित्रपट पाहत असेन तर मला आनंद वाटतो. एखाद्या गोष्टीतून मला आनंद मिळत नसेल तर मी ती गोष्ट बंद करतो. तसे वाटणेसुद्धा तुमच्या मनावर अवलंबून आहे.
- अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते

कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच समाधान
आपले कुटुंब नकळत आपल्यावर प्रेम करत असते. आपली माणसे अनेक गोष्टी करतात, ज्याची आपल्याला जाणीवही होत नाही. कधी मी शूटिंगवरून उशिरा घरी येतो तेव्हा अंथरूण घातलेले असते. जेवणाचे गरम ताट वाढले जाते. आपलं कुटुंब आपल्यासोबत सुखी असेल तर आपण आनंदात आहोत. आपले जग आनंदी आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यापेक्षा माझ्यासाठी आनंदाची दुसरी व्याख्याच नाही. आता समाजापुढे असलेला मोठा प्रश्न म्हणजे मानसिक ताण. प्रत्येक व्यक्ती काही कारणांनी अस्वस्थ असतोच. त्यातून बाहेर पडायला हवे. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे ठरवायला हवे. त्यामुळे दुःख कमी होईल आणि माणसे आनंदी राहतील.
- कुशल बद्रिके, अभिनेता

छोट्या छोट्या गोष्टींतून आनंदी राहता येते
माझा आनंद माझ्या कामात असतो. विशेष म्हणजे आपण समाधानी राहणे गरजेचे आहे. जेवढे आपण समाधानी राहू, तेवढा आपल्याला जास्त आनंद मिळेल.
अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन माझा छंद होता आणि तेच माझे प्रोफेशन आहे, याचा मला आनंद आहे. माझे कुटुंब, मित्रपरिवार आणि माझे काम माझा आनंद आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला आनंद शोधता येतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. रस्त्यातून जाताना एखाद्या पोलिसाला किंवा गरिबांना एखादी पाण्याची बाटली दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या हसूतही तुम्ही आनंद मिळवू शकता. तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत घालवलेला वेळ, तुमचे काम किंवा दुसऱ्याला मदत करून मिळालेले समाधान अशा लहान गोष्टींतूनही आपण आनंदी राहू शकतो.
- प्रसाद खांडेकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com