तरुणांचा उत्साह शिगेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांचा उत्साह शिगेला
तरुणांचा उत्साह शिगेला

तरुणांचा उत्साह शिगेला

sakal_logo
By

नववर्ष स्वागताला ढोल-ताशा पथकांचा ‘गजर’
गिरगावात शोभायात्रांची धामधूम; तरुणांचा उत्साह शिगेला

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी यंदा तरुण-तरुणींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जल्लोषाकरिता गिरगावातील ढोल-ताशा पथकेही सज्ज होत आहेत. १३ वर्षांपासून गिरगावातून निघणाऱ्या शोभायात्रेची शान म्हणजे ढोल-ताशाचा गजर. ‘गजर’ पथकाचीही जोरदार तयारी सुरू असून त्यात सहभागी झालेल्या १७० हून अधिक मुला-मुलींची रंगीत तालीम नुकतीच पार पडली. यंदा शोभायात्रेदरम्यान पथकातर्फे पारंपरिक वाद्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. त्यासाठीचा जोरदार सराव अंतिम टप्प्यात आला आहे.
गिरगावात अनेक वर्षांपासून सांस्कृतिक महोत्सव आणि सण अगदी जल्लोषात साजरे केले जातात. सध्या गुढीपाडव्यानिमित्त गिरगावच्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये रांगोळ्या, विविध ढोल-ताशा पथके, मिरवणुका आणि बाईक रॅली काढल्या जात आहेत. परंपरेनुसार शोभायात्रेला अत्यंत महत्त्व असून त्यासाठी विविध देखावेही तयार केले जात आहेत.
‘गजर’ पथकाची सुरुवात पहिल्यांदा सात ढोलांपासून झाली. आता पथकाचा विस्तार वाढला असून जवळपास ५० ढोल-ताशा शोभायात्रेत सहभागी होतात. पथकप्रमुख रोहन पर्नेकर आणि विक्रांत सुर्वे, विघ्नेश सुर्वे आणि इतर सदस्यांनी मिळून ढोल-ताशा पथक सुरू केले. एकूण १७० मुले-मुली पथकात सहभागी आहेत. सात ते आठ लहान मुला-मुलींचाही त्यात समावेश आहे. सर्वांत लहान वयाचा मुलगा सहा वर्षांचा आहे. सर्वांत जास्त वयोगटातील सदस्य ४० वर्षांपर्यंत आहेत.

पथकप्रमुख रोहन पर्नेकर यांनी सांगितले, की विरार परिसरातील मुला-मुलींकडूनही आमच्याकडे चौकशी केली जाते. आमच्या जवळच्या परिसरातूनही पथकासाठी विचारणा होते. ध्वजप्रणाम आणि अनेक स्तोत्र असतात. यंदा वेगळी संकल्पना घेऊन आम्ही नागरिकांना भेटणार आहोत. कोविडमध्ये सराव सुरू होता; पण आता सर्वच निर्बंध उठले आहेत. नवीन ऱ्हिदम आणि गाण्यांची मेजवानी यंदा अनुभवायला मिळणार आहे. गेल्या वर्षी मास्क फ्री इंडिया थीम होती. यंदाची थीम वेगळी आहे.

ढोल-ताशासह झांजही
पथकप्रमुख विघ्नेश सुर्वे म्हणाले, ‘यंदा ढोल-ताशासह झांजेचीही साथ असणार आहे. दोन पारंपरिक वाद्यांची जुगलबंदी होईल. जानेवारीपासून आम्ही सराव करत होतो. आज रंगीत तालीम होती. तयारी जोरदार झाल्याने यंदा नक्कीच वेगळेपण सर्वांना पाहायला मिळेल.