स्वच्छता सर्वेक्षणात गावठाणे दुर्लक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छता सर्वेक्षणात गावठाणे दुर्लक्षित
स्वच्छता सर्वेक्षणात गावठाणे दुर्लक्षित

स्वच्छता सर्वेक्षणात गावठाणे दुर्लक्षित

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० ः शहरात स्वच्छता सर्वेक्षणाच्या अनुषंगाने स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छतेची पाहणी करताना दिसत आहेत; मात्र गावठाणांमध्ये अधिकाऱ्यांचा मोर्चा वळला नसल्याने गावातील दुर्गंधी, कचरा आणि बांधकाम साहित्याच्या राडारोडामुळे गावठाणांना बकाल स्वरूप आले आहे.
स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक पटकावण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, पदपथ, उड्डाणपुलांखालील भिकारी, कचराकुंड्या येथे स्वच्छता राखण्यासाठी आयुक्त धावताना दिसत आहेत. या स्पर्धेत नागरिकांचा सहभाग वाढावा याकरिता शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी रहिवाशांकडून स्वच्छतेसाठी घेतली जात आहे. चौकांमध्ये आधीच तयार केलेल्या स्मारकांचे पुन्हा सुशोभीकरण केले जात आहे, परंतु गावठाणांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या बहुतांश गावांमध्ये स्वच्छतेविषयक प्रयत्नच होत नसल्याचे दिसत असल्याने गावठाणांना बकाल स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी उकिरड्यावर टाकण्यात येणारे जेवणाचे खरकटे; तर दुसरीकडे बेकायदा बांधकामांसाठी आणलेले साहित्य राजरोसपणे गावातील अडगळीच्या ठिकाणी साठवून ठेवले जात आहे.
---------------------------------------------
पालिकेचे भरारीपथक निद्रावस्थेत
घणसोली, गोठिवली, दारावे, करावे, नेरूळ गावातील अंतर्गत रस्त्यांवर कडेला बांधकामात वापरण्यात येणारी ग्रीट, सिमेंटच्या विटा, खडीचे ढिगारे साठवलेले आहेत. काही ठिकाणी हे ढिगारे दिसू नयेत म्हणून पत्रे अथवा हिरवी जाळी लावून लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, पण राजेश नार्वेकर यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात हे बांधकाम साहित्य दिसून आल्याने आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीसुद्धा डेब्रिजविरोधी भरारी पथक निद्रावस्थेत असल्याने गावठाणांना बकाल स्वरूप आले आहे.
--------------------------------
गावठाणांमध्येही महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असते. फक्त काही ठिकाणी असणाऱ्या अरुंद रस्त्यांमुळे अडगळीत ठेवलेले बांधकाम साहित्य उचलण्यात अडचणी येत आहेत, परंतु त्यावर योग्य ती कार्यवाही सुरू आहे.
- डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, नवी मुंबई महापालिका