
निसर्गाला मारक प्रकल्प थांबवा
विरार, ता. २० (बातमीदार) : वसई-विरार पालिका प्रशासनाने निसर्गाला मारक असलेले प्रकल्प तातडीने थांबवावेत. ते प्रकल्प इतरत्र हलवावेत, अशी सूचना हरित वसई चळवळीचे नेते व ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ मार्कुस डाबरे यांनी पालिकेला केली आहे. महापालिकेच्या प्रस्तावित सांडपाणी प्रकल्पाविरोधात गोखिवरे ग्रामस्थांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
वसई-विरार महानगरपालिकेचा प्रस्तावित सांडपाणी प्रकल्प गॅसऐवजी गोखिवरे येथे सुरू करण्यात येणार असल्याच्या बातमीने गोखिवरे ग्रामस्थ नाराज झाले आहेत. हा प्रकल्प गोखिवरे गावात कोणत्याही परिस्थितीत येता कामा नये यासाठी गोखिवरे ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गोखिवरे परिसर हा शेतिप्रधान असून येथील शेकडो एकर जमीन ही वनक्षेत्र म्हणून राखीव आहे. गोखिवरे गावाजवळच राजावली, पेल्हार, बापाणे आदी शेतिप्रधान गावे आहेत. या परिसरात एक मोठी खाडी असून या खाडीच्या माध्यमातून पावसाचे पाणी वसईच्या खाडीत जाते. अशा या निसर्गरम्य परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यास येथील स्थानिकांना दुर्गंधीत जगावे लागेल. शिवाय आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. या प्रकल्पामुळे ते पूर्णपणे उद्ध्वस्त होतील, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा प्रस्तावित प्रकल्प गोखिवरे येथून इतरत्र हलवण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अनिलकुमार पवार यांना पत्राद्वारे केली आहे. आपली मागणी महापालिकेने मान्य न केल्यास मात्र या प्रकल्पाविरोधात उग्र आंदोलनही छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.