
भाजपला राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घावेच लागेल : महादेव जानकर
मनोर, ता. १९ (बातमीदार) : सध्याच्या घडीला भाजपला राष्ट्रीय समाज पक्षाची गरज उरली नसली, तरीही माझा पक्ष राखून असलेल्या ताकदीमुळे भाजपला रासपला युतीमध्ये घ्यावेच लागेल. काही हजार मतांमुळे उमेदवार निवडणुकीत पडत असताना माझा पक्ष राखून असलेली दोन टक्के मते महत्त्वाची ठरतात, रासपचे उपद्रवमूल्य भाजपचे राजकीय नुकसान करू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी येथे केले.
राज्यातील आगामी लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर पक्ष बांधणीच्या निमित्ताने शनिवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मनोरच्या माधवधाम येथे त्यांनी पत्रकारासोबत संवाद साधला. रासपची ताकद असलेल्या भागात पाच लोकसभेच्या जागा देण्याची मागणी भाजपकडून मान्य न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन राज्यात लोकसभा निवडणुका लढवण्याची घोषणा महादेव जानकर यांनी केली आहे. आम्ही राखून असलेल्या दोन टक्के मतांमुळे अनेक उमेदवार पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत रासपचे १५ ते २० आमदार निवडून येणार असल्याचे भाकीत जानकर यांनी वर्तवले. जिल्ह्याच्या समस्या आवाज उठवण्यासाठी पालघर लोकसभा मतदारसंघात रासपचा उमेदवार उभा करण्याची घोषणाही त्यांनी केली. सामाजिक हित लक्षात घेत ओबीसी आणि मुसलमानांनी एकत्र आले पाहिजे. आदिवासींच्या आरक्षणात बदल न करता आदिवासी आरक्षणाअंतर्गत श्रेणी तयार करून धनगरांना आरक्षण देण्याची मागणी जानकर यांनी या वेळी केली.
---
प्रकल्पबाधितांच्या पाठीशी
वाढवण गावात प्रस्तावित असलेले व्यापारी बंदर अन्य राज्यात जाऊ देता कामा नये. वाढवण बंदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पाशी निगडित अनेक समस्या आहेत. प्रकल्पबाधित स्थानिक भूमिपुत्रांच्या संपादित जमिनीला उचित मोबदला, विस्थापितांचे पुनर्वसन तसेच प्रकल्पाचा लाभ स्थानिकांना मिळावा, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा रासपतर्फे केला जाईल, तसेच भूमिपुत्रांच्या पाठीशी ठाम उभा असल्याचे आश्वासन जानकर यांनी दिले.