पगार मागणाऱ्या कामगाराला तिसऱ्या मजल्यावरून दिले ढकलून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News
पगार मागणाऱ्या कामगाराला तिसऱ्या मजल्यावरून दिले ढकलून

Mumbai News : पगार मागणाऱ्या कामगाराला तिसऱ्या मजल्यावरून दिले ढकलून

नवी मुंबई : केलेल्या कामाचा पगार मागणाऱ्या कारपेंटरला फोरमनसह चौघांनी बेदम मारहाण करून तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याची घटना सानपाडा येथील अक्षर इमारतीच्या बांधकाम घटनास्थळावर शुक्रवारी रात्री घडली. या घटनेत कारपेंटर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सानपाडा पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव अमरपाल रामब्रीज निशाद (वय २५) असे असून तो सानपाडा सेक्टर- १३ मध्ये बांधकाम सुरू असलेल्या अक्षर इमारतीच्या बांधकाम साईटवर कारपेंटरचे काम करतो. गतशुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अमरपाल व फोरमन अखिलेश चौरसिया या दोघांमध्ये इमारतीच्या पार्किंगच्या तिसऱ्या मजल्यावर पगाराबाबत बोलणी सुरू होती. अमरपाल याला गावी जायचे असल्याने त्याने अखिलेश चौरसिया याच्याकडे उर्वरित दिड महिन्यांच्या पगाराची मागणी केली.

त्यामुळे अखिलेशने अमरपाल याला शिवीगाळ करून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावरून त्या दोघांमध्ये धक्काबुक्की सुरू असल्याचे पाहून अखिलेशसोबत काम करणारे रामशरण निशाद व इतर कामगारांनीदेखील अमरपाल याला मारहाण केली. तसेच त्याला तिसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधून खाली ढकलून दिले. त्यामुळे खाली पडल्याने अमरपालच्या कमरेला आणि दोन्ही पाय व हनुवटीला गंभीर दुखापत झाली.

या घटनेत जखमी झालेल्या अमरपाल याला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सानपाडा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्याचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर पोलिसांनी अमरपाल याला मारहाण करणाऱ्या अखिलेश चौरसिया, रामशरण निशाद व इतर दोन कामगारांविरोधात गुन्हा दाखल करूत दोघांना ताब्यात घेतले आहे.