
देशातील नऊ टक्के गुन्हे महाराष्ट्रात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : राज्याच्या गृहविभागाच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणारा अहवाल समर्थन अध्ययन केंद्र या संस्थेने जारी केला आहे. देशात गुन्ह्यांच्या नोंदणीत राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालाच्या आकडेवारीत समोर आले आहे. २०२१ मध्ये भारतीय दंडसंहितेअंतर्गत सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची देशांत सर्वाधिक ५,४०,८०० प्रकरणे महाराष्ट्रात नोंदली गेल्याची माहिती गृहविभागाच्या अर्थसंकल्पाच्या अहवालातून समोर आली आहे.
महाराष्ट्रात सन २०२१ मध्ये ५ लाख ४० हजार ८०० गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. सन २०२१ मध्ये भारतात ६० लाख ९६ हजार ३१० गुन्हे नोंदवले गेले असून नोंदविलेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये तमिळनाडू ७ लाख ५६ हजार ७५३, गुजरात ७ लाख ३१ हजार ७३८, उत्तर प्रदेश- ६ लाख ८ हजार ८२; तर महाराष्ट्र ५ लाख ३० हजार ८०० इतके गुन्हे दाखल झाले असून महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात एकूण घडलेल्या ६० लाख ९६ हजार ३१० गुन्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्ह्यांचे प्रमाण ८.८७ टक्के आहे.
...
मुंबईत २७ टक्के वाढ
अहवालानुसार २०२१ मध्ये मुंबई शहरात विविध अशा ६३,६८९ गुन्ह्यांची नोंद झाली. सर्वांत जास्त देशाच्या राजधानीत २.८९ लाख गुन्ह्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या. मुंबईत दररोज सरासरीने किमान १७४ विविध प्रकारचे गुन्हे आयपीसी कलमांतर्गत नोंदवले गेले. आकडेवारीनुसार २०१९ आणि २०२०च्या तुलनेत २०२१ मुंबईत गुन्हेगारीत २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
...
महिलाविरोधी गुन्ह्यांत तिसरा क्रमांक
समर्थन संस्थेच्या अहवालातील आकडेवारीनुसार २०२१ या वर्षी देशातील महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार २०२१ या वर्षी महिलांविरुद्ध एकूण ४,२८,२७८ गुन्हे नोंदवले गेले. त्यापैकी उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५६,०८३ गुन्हे नोंदवले गेले. त्यानंतर राजस्थान ४०,७३८ आणि महाराष्ट्र ३९,५२६ गुन्हे नोंदवले गेले आहेत. सरासरी पाहता महाराष्ट्रात रोज ११२ महिलांविरोधात अत्याचाराच्या घटनांची नोंद २०२१ मध्ये करण्यात आली. महानगरांच्या बाबतीत दिल्ली ३,९४८ नोंदणीकृत गुन्ह्यांसह आघाडीवर आहे, त्यानंतर मुंबई (१,१०३) आणि बेंगळूरु (५७८) आहे.
...
पोलिसांवर वाढता ताण
महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १६९ पोलिस आहेत. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अंदाजित १२ कोटी ४९ लाख एवढी असून २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात प्रत्यक्ष पोलिस संख्याबळ एक लाख ८७ हजार ९३१ आहे. म्हणजेच एक लाख लोकसंख्येसाठी १६९ पोलिस आहेत. महाराष्ट्रात महिला पोलिसांची संख्या ३१ हजार २३३ इतकी असून एकूण पोलिस संख्याबळाच्या तुलनेत ही संख्या १६.६१ टक्के इतकी आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची आवश्यकता आहे.
...
विनयभंगाची प्रकरणे
अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत मुंबई यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये मुंबईत अल्पवयीन मुलांनी केलेल्या ६११ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे, ज्यात चोरी आणि मारहाणीच्या अनेक प्रकरणांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार २०२१ मध्ये महिलांशी विनयभंग केल्याचे सर्वांत जास्त १४,८५३ प्रकरणे ओडिशा राज्यात नोंदवली; तर महाराष्ट्र १०,५६८ प्रकरणांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश ९३९ आहे. विनयभंगाची सर्वांत जास्त २,०२२ प्रकरणे दिल्लीत नोंदवली गेली. याच काळात मुंबईत १,६२५ आणि जयपूरमध्ये ५८६ गुन्हे दाखल करण्यात आहेत.
...
राज्यात गुन्ह्यांची नोंद सर्वांत जास्त होते, हे खरे असले, तरी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे लागेल. कारण गुन्हे घडले, तर त्याची नोंद केली जाते. काही राज्यांत गुन्ह्यांची नोंदसुद्धा होत नाही, असे पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र पोलिस दल हे एक प्रोफेशनल दल आहे.
- पी. के. जैन, माजी पोलिस अधिकारी
...
गुन्ह्यांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे, याचा अर्थ गुन्हेगारी निश्चित वाढली आहे; परंतु बरेचसे गुन्हे हे राजकीय आणि वैयक्तिक वैमनस्यामुळे नोंदवले जातात. त्यामुळे असे किती गुन्हे नोंदवले गेले, याचे विश्लेषण होणेसुद्धा गरजेचे आहे.
- धनराज वंजारी, माजी पोलिस अधिकारी
...
आकडेवारीनुसार २०२१ या वर्षी मुंबईत ७,८२० चोरीच्या घटनांची नोंद झाली. याच कालावधीत फसवणुकीचे ४,८९९, रॅश ड्रायव्हिंगचे गुन्हे २,२८२, अपहरणसंबंधित गुन्हे व लैंगिक छळ १,५९०, बलात्काराचे ३६४; तर दंगलीचे ३०३ आणि खुनाच्या १६२ प्रकरणाची नोंद मुंबईत झाल्याचे अहवालात समोर आले.