
सलमान खानला पुन्हा धमकी
मुंबई, ता. १९ : अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल आला आहे. सलमानला आलेल्या मेलमध्ये दिल्लीच्या तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिष्णोईचा उल्लेख आहे. या प्रकरणी रविवारी वांद्रे पोलिस ठाण्यात बिष्णोई गँगच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तसचे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सलमान खानला याला यापूर्वीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जून २०२२ मध्ये वांद्रेच्या बॅंडस्टॅंड परिसरात सलमानचे वडील सलीम खान हे फिरायला गेले असताना त्यांच्या बाजूला अज्ञाताने धमकीवजा चिठ्ठी ठेवसी होती. त्यानंतर आता ई-मेलच्या माध्यमातून सलमानला पुन्हा धमकी मिळाली आहे. ‘गोल्डीभाईला सलमानशी बातचीत करायची आहे. टीव्हीवरील मुलाखत पाहिली तर असेलच. पाहिली नसेल तर पाहायला सांगा. आता वेळ असल्याने सांगून ठेवता, पुढच्यावेळी मोठा झटका देऊ’, असा मजकूर ई-मेलमध्ये लिहिण्यात आला आहे.