१५ हजार घरांमध्ये वीज चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१५ हजार घरांमध्ये वीज चोरी
१५ हजार घरांमध्ये वीज चोरी

१५ हजार घरांमध्ये वीज चोरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : कळवा-मुंब्रा-शिळ परिसरात अद्यापही १५ हजारांहून अधिकर घरे मीटरशिवाय बेकायदा वीज वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वीज चोरीमुळे वीजपुरवठा करणारी कंपनी त्रस्त झाली असून नियमित वीज बिलभरणा करणाऱ्या ग्राहकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
कळवा-मुंब्रा-शिळ परिसरात सव्वातीन लाखांवर वीज ग्राहक आहेत. मार्च २०२० मध्ये जेव्हा टोरंट पॉवरने फ्रँचाईजी म्हणून या भागाचा कारभार हाती घेतला, तेव्हा या क्षेत्रातील वीजगळती व नुकसानीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होते. कंपनीने केलेल्या उपायांमुळे गळती थोडी कमी झाली असली, तरी अजून हे प्रकार पूर्णपणे थांबवणे मोठे आव्हान आहे. यावर उपाय म्हणून ज्यांचे मीटर महावितरणच्या काळात पीडी (कायमस्वरूपी बंद) झालेले आहेत, अशा ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून त्यांचा वीजपुरवठा सुरळित करून घेतला. असे असतानाही काही ग्राहक अद्यापही मीटर न लावता बेकायदा वीज वापरत असल्याचे आढळून आले आहे. टोरंट पॉवरच्या भरारी पथकाद्वारे अनेक ठिकाणी धाडी घालून वीज चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. असे असूनही १५ हजार घरे आजमितीस मीटरशिवाय वीज वापरत आहेत. या बेकायदा वापरामुळे नियमित वीज बिल भरणा करत असलेल्या ग्राहकांवर अन्याय होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.


----------------------------
हेल्पलाईनवर संपर्क साधा
वीज चोरी करणारे अनधिकृतपणे वीज केबलमध्ये, मीटरमध्ये छेडछाड करत असल्याने वीज पुरवठ्यामध्ये व्यत्यय येतो. वीज चोरी करताना अपघात होऊन मृत्यूही होऊ शकतो. कळवा-मुंब्रा-दिवा परिसरातील जागरूक ग्राहकांनी वीज चोरीबाबत ग्राहक कक्षाशी हेल्पलाईन १८०० २६७ ७०९९ किंवा ०२५२२-२४१९०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे टोरंट कंपनीने ग्राहकांना आवाहन केले आहे.