कल्याणमध्ये वन्यप्राणी, पक्षी छायाचित्रांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये वन्यप्राणी, पक्षी छायाचित्रांचे प्रदर्शन
कल्याणमध्ये वन्यप्राणी, पक्षी छायाचित्रांचे प्रदर्शन

कल्याणमध्ये वन्यप्राणी, पक्षी छायाचित्रांचे प्रदर्शन

sakal_logo
By

कल्याण, ता. २० (बातमीदार) : जागतिक वन दिनाचे औचित्य साधत मंगळवारी ( ता.२१) सकाळी नऊ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत कल्याण तालुक्यातील वनपरिक्षेत्रात वास्तव्यात आढळणारे विविध जीव, प्राणी, पक्षी, सर्प यांचे व बचाव केलेल्या अन्य जीवांचे भव्य छायाचित्र प्रदर्शन वनविभागाने आयोजित केले आहे. कल्याण वनपरिक्षेत्रात विविध प्राणी, पक्ष्‍यांचे वास्तव्‍य असून त्यांची छायाचित्रे या प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. आजूबाजूच्या जंगल परिसरात सर्वसामान्य नागरिक जात नसल्याने अभूतपूर्वक प्राणी, पक्षी तसेच विविध जातींचे सर्प या जंगलात वास्तव्‍य करून राहतात. नेमके अशाच दुर्मिळ प्राण्यांचे छायाचित्र वन्यजीव प्राणी मित्रांनी कॅमेरामध्ये टिपले असून, या प्रदर्शनास नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी केले आहे. या प्रदर्शनात कल्याण शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदविला असून, महात्मा फुले पुतळ्यानजीक असलेल्या वनविभागाच्या कार्यालयीन आवारात हे प्राणी, पक्षांचे खुले छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जखमी व बचाव केलेल्या प्राण्यांचे छायाचित्र या प्रदर्शनात प्रामुख्याने असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------
शहापुरात कला महोत्सव २०२३
शहापूर, ता. २० (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील साहित्यिक, कलारत्न आदी सर्वांना एकाच व्यासपीठावर सादरीकरणाची संधी मिळावी या उद्देशाने माऊली प्रतिष्ठान, शहापूरच्या वतीने शहापुरात ३० एप्रिल व १ मे ला दोन दिवस ‘शहापूर कला महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात येणार आहे. शहापूर तालुक्यात अनेक साहित्यिक, कलारत्न असून, अनेक कलाकार, लेखक, कवी, गायक, वादक, नर्तक, व्याख्याते, निवेदक, अभिनेते, नाटककार आदी प्रतिभासंपन्न व्यक्‍तिमत्त्‍वे आहेत. या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून सादरीकरणाची संधी मिळावी व कलाविष्कार सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने माऊली प्रतिष्ठान, शहापूरच्या वतीने ‘शहापूर कला महोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहापूर तालुक्यातील अनेक साहित्यिक, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात सखोल आणि सविस्तर चर्चा करण्यात आली असल्‍याचे माऊली प्रतिष्ठानचे अध्‍यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले.