
बेकायदा बाजारांची स्पर्धा
घणसोली, ता.२० (बातमीदार)ः विभागातील गावदेवी वाडी परिसरात रविवारी भरणाऱ्या बेकायदा आठवडा बाजारामुळे रस्त्यावरील कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून अनेकदा या बाजारांवर कारवाई केली जात आहे. पण या कारवाईला फेरीवाले जुमानत नसल्याने शहरात बेकायदा आठवडा बाजार भरवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.
घणसोली विभागात अनेक ठिकाणी आठवडा बाजारात भरतात, मात्र यात अनेक आठवडा बाजार मुख्य रस्त्यावर भरवले जात असल्याने स्थानिकांसाठी मोठी डोकेदुखी होत आहे. त्यामुळे घणसोली विभागात मोठ्या प्रमाणात बेकायदा मार्केट उभे राहू लागले आहेत. घणसोलीतील नाल्यांपासून मोकळ्या असलेल्या सर्वच जागांवर कब्जा केला जात आहे. शहरातील गावदेवी वाडीत देखील अनेक दिवसांपासून प्रत्येक रविवारी बाजार भरवला जात आहे. या ठिकाणी शहरातीलच नव्हे तर परप्रांतीय फेरीवाले देखील मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र हा बाजार मोकळ्या मैदानावर अथवा भूखंडावर भरवला जात नसून गावदेवी वाडीच्या मुख्य रस्त्यावर भरत असल्याने सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची निर्माण होत आहे. तसेच या बाजरामुळे मुख्य रस्त्यावर अपघाताची शक्यता असल्याने पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
----------------------------------------------
स्थानिकांची डोकेदुखी वाढली
नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली विभागाच्या कार्यालयाबाहेर देखील अशा प्रकारचा बाजार भरवला जातो. तसेच मिळेल तिथे फेरीवाले बस्तान मांडत आहेत. यासाठी परिसरातील विद्युत डीपींचा देखील वापर होत असल्याने अपघातांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेने अशा बेकायदा आठवडा बाजारांना कायमस्वरुपी बंदी घालावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
----------------------------------------
घणसोली विभागात अनेक ठिकाणी भरणाऱ्या बाजारांवर वेळोवेळी कडक कारवाई केली जाते. मात्र, महापालिकेच्या कारवाईला न जुमानता फेरीवाले पुन्हा बाजारात बसतात.
-संतोष शिलं, अतिक्रमण अधिकारी, घणसोली
--------------------------------------
घणसोली गावदेवी वाडी तसेच विभागात ठिकठिकाणी आठवडा बाजार भरत आहे. यामुळे वाहतुकीसह स्थानिक नागरिकांना देखील विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर महापालिकेने कायमस्वरूपी कारवाईची गरज आहे.
-नीता अहिरे, नागरिक