
उड्डाणपुलाखाली जुगाऱ्यांचे घोळके
घणसोली, ता. २० (बातमीदार)ः ठाणे-बेलापूर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिकेने उड्डाणपुलांची निर्मिती केली आहे; मात्र या उड्डाणपुलांखाली खुलेआम जुगाऱ्यांच्या बैठका बसत असून पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
तुर्भे ते दिघा या परिसरादरम्यान मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोपरखैरणे, घणसोली, रबाळे येथे उड्डाणपूल तयार केले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या वतीने या उड्डाणपुलांखाली रंगरंगोटी करण्यात आली आहे, पण प्रवाशांसाठी दिलासादायक असणारे हे उड्डाणपूल सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. कारण या उड्डाण पुलांच्या खाली दिवसाढवळ्या जुगार खेळण्याचे प्रकार होत आहेत. विशेष म्हणजे या जुगाऱ्यांवर पोलिस कारवाईसाठी गेले असता फक्त विरंगुळा म्हणून खेळत असल्याचे भासवले जात आहे.
-----------------------------
घणसोली उड्डाणपुलाखाली जुगार खेळला जातो. पोलिसांच्या वतीने अनेकदा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
- सुधीर पाटील, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी