
कारचे सायलेन्सर चोरणाऱ्या दोघांना अटक
अंधेरी, ता. २० (बातमीदार) : कारचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या दोघांना समतानगर पोलिसांनी अटक केली. अब्बास मोहम्मद लेस शेख आणि अली हुसैन सिराजउद्दीन खान अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी कारसह टेम्पोचे सहा सायलेन्सर हस्तगत केले आहेत. या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
१८ फेब्रुवारीला तक्रारदाराने त्यांची कार कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स, आशियाना सोसायटीजवळ पार्क केली होती. २० फेब्रुवारीला ते कारजवळ आले असता त्यांना कारचे सायलेन्सर चोरी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण राणे यांच्या पथकाने परिसरातील सीसी टीव्ही चित्रीकरणाची पाहणी केली. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी अब्बास शेख आणि अली हुसैन खान यांना अटक केली. तपासात ते दोघेही सराईत कार सायलेन्सर चोरी करणारे गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरोधात समतानगर पोलिस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद आहे.