
शेतकऱ्यांनी सलोखा योजनेचा लाभ घ्यावा
विक्रमगड, ता. २० (बातमीदार) : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णयानुसार विक्रमगड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सलोखा योजना राबवण्यात येत आहे. शेतजमिनीचा ताबा व वहीवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसातील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य वाढीस लावण्यासाठी ही योजना आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे, बारा वर्षांपासून असणाऱ्या शेत जमीनधारकांचे अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क एक हजार रुपये व नोंदणी शुल्क एक हजार रुपये आकारणेबाबत सवलत देण्याची सलोखा योजना राबवण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. तरी विक्रमगड तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार यांनी केले आहे.