
सेंट जोसेफ महाविद्यालयात शेतकरी मेळावा
विरार, ता. २० (बातमीदार) : सत्पाळा येथील सेंट जोसेफ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागाने आयक्यूएसीअंतर्गत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा यांनी केले. कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे कृषीतज्ज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी शेती उत्पादन कसे वाढवावे, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. झाडाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर तसेच कीटकनाशके किती व कशी फवारावीत या विषयावर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सहाणे यांनी मधुमक्षिका पालनाचे महत्त्वदेखील समजावून सांगितले. या वेळी वसई पंचायत समितीचे कृषी अधिकारी आदित्य राऊळ, प्राचार्य डॉ. प्रकाश डोंगरे, फ्रान्सिस तुस्कानो, प्रा. शर्ली गोन्साल्विस, प्रा. डॉ. कविता आल्मेडा आदी उपस्थित होते.