
कासात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
कासा, ता. २० (बातमीदार) : कासा आणि चारोटी परिसरात सध्या मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कासा आणि चारोटी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढत आहेत. या वाढत्या नागरिकरणाबरोबरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांच्या आसपास या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या कचऱ्यात खाणे शोधण्यासाठी या कुत्र्यांची भटकंती सुरू असते. मुख्य बाजारपेठेतील हॉटेल, मासळी बाजार, चिकन आणि मटणाच्या दुकानांच्या आसपास हे कुत्रे फिरत असतात. या कुत्रांचा त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.
कासा बाजारपेठ, स्मशानभूमी, चारोटी नाका या परिसरात ही मोकाट कुत्री फिरत असतात. मागील आठवड्यात कासा बाजारपेठेत एका पिसाळलेल्या कुत्रा सहा जणांना चावला. यामुळे त्या सहा जणांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबतीत खबरदारी घेतली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
....
मुंबई आसपास परिसरात आम्ही आमच्या संस्थेतर्फे अशा कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण यावे यासाठी उपाययोजना करीत असतो. कासा भागात देखील आम्ही येऊन या भटक्या कुत्र्यांसाठी होणाऱ्या रोगांवर औषध, लस देण्याचा प्रयत्न करू.
- स्नेहा महाडिक, पेटा सदस्य
...
भटक्या कुत्र्यांची मोठी समस्या या भागात आहे. अनेक कुत्र्यांना लस दिले पाहिजे. रेबीज होण्याअगोदर लस दिल्यास उपाययोजना होऊ शकतात. पण रेबीज झाल्यानंतर ग्रामपंचायत मार्फत काळजी घेऊन त्यांना पकडून ठेवणे गरजेचे आहे. रेबीजमुळे ३६ ते ४८ तासांमध्ये ते कुत्रा मरण पावते. मेल्यानंतर सुद्धा त्याची नीट विल्हेवाट लावली पाहिजे.
- डॉ. एस. धूम, पशुधन पर्यवेक्षक