
घरफोडी टळण्यासाठी सतर्क रहा
शहापूर, ता. २० (बातमीदार) ः लवकरच १० वी व १२2 वी च्या परीक्षा संपून शाळांना व महाविद्यालयांना सुट्टी लागणार आहे. या सुट्ट्यांमध्ये नागरिक बाहेरगावी जातात. नेमकी हीच वेळ साधून घरफोडी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन शहापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलिसांनी नागरिकांनी सुट्टीच्या काळात कोणती सतर्कता पाळावी त्यानुसार सोसायटीच्या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी व इमारतीच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, तसेच इमारतीच्या सर्व बाजूंना चांगली प्रकाश व्यवस्था करण्यात यावी. सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या (हौसिंग सोसायटीचे) क्षेत्रानुसार सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा, तसेच सुरक्षा रक्षकांची पोलिस ठाण्याकडून चारित्र्य पडताळणी करून घ्यावी.
त्याचप्रमाणे सुट्टीवर जाताना दागिने, वस्तू, पैसे बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत, घराबाहेर जाताना शेजाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगावे, सोयायटीच्या परिसरात अनोळखी व्यक्ती, फेरीवाले यांना प्रवेश देऊ नये.
सोसायटीमधील रूम भाडेकरूस राहण्यास देण्यापूर्वी त्यांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी व ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करावे. दरवाजाला अलार्म बेल लावावी, आपल्या राहत्या घराच्या दरवाजावर सीसीटीव्ही कॅमेरे लावून तो स्वतःच्या मोबाईलशी लिंक करून घ्यावा. तसेच सोसायटीकडे व सुरक्षा रक्षकाकडे जवळील पोलिस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे व सोसायटीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींबाबत माहितीची नोंद घेण्यासाठी नोंदवही ठेवून त्यामध्ये त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, कोणाकडे जाणार आहे याबाबत नोंद करावी आणि सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य व्यवस्थित बजावत आहेत किंवा नाही याबाबत सोसायटीच्या पदाधिकारी यांनी वेळोवेळी खात्री करावी, असे जाहीर आवाहन पोलिस निरीक्षक शहापूर पोलिस ठाणे यांनी केले आहे.
20/03/2023