
हद्दपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नवी मुंबई (वार्ताहर) : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केलेल्या राहुल दांडगे (वय ४१) याला तुर्भे इंदिरा नगर भागातून अटक करण्यात आली आहे. तुर्भेतील एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी राहुल दांडगेवर मारामारी, चोरी यासह इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. राहुल दांडगे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर परिमंडळ-१ च्या पोलिस उपायुक्तांनी ऑगस्ट-२०२२ मध्ये त्याला मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार केले होते; मात्र असे असताना आरोपी राहुल दांगडे हा गुरुवारी (ता. १६) कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तुर्भे येथे आला होता. याबाबतची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.