बागायतीत पुन्हा अज्ञातांचा धुडगूस

बागायतीत पुन्हा अज्ञातांचा धुडगूस

बोर्डी, ता. २० (बातमीदार) : सात दिवसांपूर्वी शहरातील बाजारपेठेत पाठवण्यासाठी तयार केलेल्या चिकू फळांचे बॉक्स नदीत फेकून दिल्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा अज्ञातांनी धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या अज्ञातांनी केळी, नारळ आणि आंब्याची कलमे कापून नुकसान केले आहे. एकीकडे नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर यामुळे आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे या असामाजिक वृत्तीला आळा घालण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली जाते. बागायतीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च, देखभाल करावी लागते. एकीकडे राज्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे तर बाजारभाव गडगडल्यामुळे बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशात अज्ञातांनी हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे.
शेतकऱ्याच्या बागेतील नारळाची रोपे आंब्याची कलमे व केळीची झाडे कापून टाकण्याचा प्रकार घडल्याने बागायतदार मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या विध्वंसक आणि विकृत प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.
अविनाश सावे व सुनील राऊत यांच्या बागेतून १३ मार्च रोजी शहरातील बाजारपेठेत पाठवण्यासाठी तयार केलेले चिकू फळांचे बॉक्स नदीत फेकून दिल्याची घटना घडली होती. त्याच अविनाश सावे या शेतकऱ्याच्या वहिंद्रा येथील बागेत नव्याने लावलेली नारळाची रोपे आंब्याची कलमे व केळी बागायतीचे अज्ञातांनी नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सायंकाळी ते रात्रीच्या दरम्यान घडली असावी असा अंदाज अविनाश सावे यांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती घोलवड पोलिस ठाण्यात देण्यात आल्याचे सावे यांनी सांगितले.
-----------------
पालघर जिल्ह्यातील बोर्डी परिसरात पिकांचे नुकसान करण्यात येत असल्याने नागरिकांतून संतापाची लाट निर्माण झाली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावण्यात आला असून, तातडीने याबाबत योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com