
तुर्भेत विजेचा लपंडाव
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : ऐन उन्हाळ्यात नवी मुंबईतील विविध भागांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे अंधारात राहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे; तर दहावीची परीक्षा सुरू असतानाच सुरू असलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संतापाची भावना आहे.
नवी मुंबईकरांवर महावितरणच्या भारनियमनाचे संकट नसले, तरी अनेक भागात कोणत्या ना कोणत्या कारणाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नवी मुंबईतील तुर्भे गावात गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सातत्याने सुरू आहे; तर पावणे गावातदेखील विजेचा लपंडाव कायम सुरू असल्याने गाडीच्या हेडलाईट्सच्या प्रकाशावर होळीची पूजा करावी लागली होती. अशातच रविवारी (ता. १९) रात्री तुर्भे गावातील ट्रान्स्फॉर्मरला अचानक आग लागल्याने जवळपास सात ते आठ तास वीजपुरवठा खंडित राहिला होता. त्यामुळे रात्री-अपरात्री बत्ती गूल होत असल्याने ऐन उकाड्यात नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तसेच डासांमुळे रात्रभर जागरणाची वेळ येत असल्याने महावितरणविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
----------------------
परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे नुकसान
सध्या दहावीच्या तसेच इतर वर्गाच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच दिवसभर अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, वीजवाहिन्या भूमिगत असल्यामुळे एखाद्या ठिकाणी झालेला दोष शोधण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तासन् तास वेळ घालवावा लागत आहे. तसेच त्यासाठी लागणारी मशीन भांडुप विभागातून आणावी लागत असल्याने त्यासाठीचा लागणारा कालावधी अधिक त्रासदायक ठरत आहे.
------------------------------------
विजेच्या लपंडावामुळे खूप त्रास होत आहे. वीजवाहिन्या निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत.
- साईनाथ पाटील, ग्रामस्थ