
सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारणार
भिवंडी, ता. २० (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील अंबाडी परिसरात सुसज्ज ग्रामीण रुग्णालय नसल्याने या भागातील रुग्णांसाठी नव्याने अद्यावत रुग्णालय उभारण्याची नागरिकांची मागणी जोर धरत होती. २००६ साली रुग्णालय बांधण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली; मात्र रुग्णालय निश्चित झालेली जागा वनविभागाच्या अखत्यारीत होती. सद्यस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी ही वनजमीन आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केल्याने ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. आरोग्य प्रशासनाने त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
सध्या या परिसरातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेत आहेत; मात्र अत्यावश्यक उपचारासाठी या भागातील रुग्णांना जवळच्या खर्चिक खासगी रुग्णालयात अन्यथा सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी फरपट करावी लागत आहे. श्रमजीवी संघटनेने नुकतेच अंबाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये २४ तास सेवा मिळावी याकरिता अंबाडी फाट्यावर आरोग्य व्यवस्थेची प्रतिकात्मक शवयात्रा काढून अभिनव आंदोलन केले होते. या वेळी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. गिरीश चौधरी यांच्याशी चर्चा करून सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्याची मागणी केली होती. त्यावेळी डॉ. गिरीश चौधरी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना संपर्क केल्यानंतर पवार यांनी तसा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे आश्वासित केले होते. या ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेता हे रुग्णालय लवकरात लवकर उभारण्याची मागणी अंबाडी फाटा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
--------------------
तीन एकर क्षेत्रावर उभारणी
तीन एकरच्या भूखंडावर रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या तीस खाटांच्या रुग्णालयात अपघात, सामान्य विभाग, शस्त्रक्रीया, प्रसूतीगृह आदी विभाग कार्यरत होणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यात अत्याधुनिक रुग्णालये असावीत, जेणेकरून निष्पाप गोरगरीब नागरिकांना आपले प्राण गमावू लागू नये यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने कंबर कसली आहे. भिवंडी तालुक्यातील अंबाडी फाटा परिसरात ग्रामीण रुग्णालय बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अंबाडी फाटा हे मध्यवर्ती ठिकाण असून या परिसरातील वज्रेश्वरी ते वसई, भिवंडी मार्गावर अनगावपर्यंत, वाडा आणि पडघापर्यंतच्या आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना हे रुग्णालय सोयीचे ठरणार आहे.
-----------------------------
वनविभागाच्या मालकीची जमीन आरोग्य विभागाकडे हस्तांतरित झाली असून त्या ठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आरोग्य प्रशासनाचा राज्य, केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे