नववर्ष स्वागताचा जल्लोष

नववर्ष स्वागताचा जल्लोष

वसई ता. २१ (बातमीदार) : गुढीपाडव्यासाठी वसई-विरारसह पालघर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख बाजारपेठा सजल्या आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवशी सोन्याची खरेदी केली जात असल्याने सराफा बाजारांमध्ये उत्साह दिसून येत आहे; तर शहरातून वाजतगाजत निघणाऱ्या शोभायात्रा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
गुढीपाडव्यानिमित्त वसईतील नामांकित सोन्याच्या पेढ्यांसह शहरात वाहन, गृहखरेदीला वेग येणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे गुढीपाडव्याच्या काळात होणाऱ्या व्यवहारांवर परिणाम झाला होता; पण कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे सण उत्सव उत्साहात साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे यंदा बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येईल, अशी आशा विक्रेत्यांना आहे. त्यामुळे त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध विविध ऑफर्स ठेवल्या आहेत. त्यात सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर जास्तीत जास्त सवलत देण्यासाठी सोनेविक्रेत्यांमध्ये चढाओढ लागली असून काही पेढ्यांनी वेगवेगळी बम्पर बक्षिसेही जाहीर केल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे; तर यानिमित्ताने काढल्या जाणाऱ्या शोभायात्रादेखील आकर्षणाचे केंद्र राहणार आहेत.
वसई, विरार, बोईसर आणि पालघर या भागात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी आहेत. मात्र कोरोनाकाळात गृहखरेदी मंदावली होती. त्यामुळे बांधकाम व्यवसाय डबघाईला आला होता; परंतु गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा व्यावसायिक घर विक्रीसाठी सज्ज झाला आहे. यासाठी नवीन आकर्षक योजना, नोंदणी मोफत, सवलत आदींवर भर देत ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.
--------------
वाहन खरेदी
तरुणांकडून नवीन दुचाकी, चारचाकीची कोणती मॉडेल बाजारात आली आहेत, याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार शोरूममध्ये बुकिंग केली जात आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरच्या अंगणात नवे वाहन आणले जाणार आहे; तर व्यावसायिक दृष्टीने ट्रक, रिक्षा, टेम्पो, जेसीबी यासह अन्य वाहनेदेखील खरेदीकडे कल असणार आहे.
----------------------
मिठाई दुकानदारांची लगबग
गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड, आमरस, आम्रखंड यासह विविध प्रकारचे पेढे, लाडू तयार करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मिठाई दुकानदारांची लगबग सुरू झाली आहे; तर नववर्षाचे स्वागत करताना पूजा व विविध कार्यक्रमाचे आयोजनदेखील ठिकठिकाणी करण्यात आले आहे.
-----------------------
नवीन दागिना खरेदी करता यावा म्हणून गुढीपाडवा सणाची आतुरतेने वाट पाहत आहोत. साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा शुभमुहूर्तावर सोने खरेदी करणार आहे.
- मनीषा डोळसे, वसई
------------------
दोन वर्षांपूर्वी वाहन खरेदी करण्याचा विचार केला होता. मात्र कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली होती. त्यामुळे यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन दुचाकी खरेदी करणार आहे. यासाठी नजीकच्या शोरूममध्ये बुकिंग केले आहे.
- प्रफुल्ल मोरे, नालासोपारा
-------------
उपप्रादेशिक विभाग सज्ज
उपप्रादेशिक परिवहन विभागात नव्या वाहनांच्या नोंदणीसाठी सज्ज आहे. तसेच लायसन्स व अन्य कामकाजदेखील सुरू आहे. नवीन वर्षात किती वाहनांची नोंदणी होणार याची आकडेवारीनंतरच समजेल.
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
------------------
मंदिरात होणार भाविकांची गर्दी
पालघर जिल्ह्यातील जीवदानी देवी, शीतलादेवी मंदिर, महालक्ष्मी, चंडिका देवी मंदिर, अर्नाळा राम मंदिर यासह पालघर जिल्ह्यातील अन्य मंदिरात भाविकांची नववर्षानिमित्त दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. भाविकांना सुविधा मिळावी, यासाठी आखणी केली जात आहे.
-------------------
समुद्र परिसर गजबजणार
पालघर जिल्ह्यात समुद्रकिनारी पर्यटकांचा ओघ नवीन वर्षात असणार आहे. त्यामुळे हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये गर्दी होणार आहे. पर्यटकांसाठी व्यावसायिकदेखील सज्ज झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com