
स्वच्छतागृहांसाठी ‘टमरेल’ आंदोलन
विरार, ता. (बातमीदार) : शहरातील आदिवासी पाड्यांवर सार्वजनिक शौचालयाच्या मागणीसाठी महिलांनी टमरेल घेऊन अनोखे आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या महिला आंदोलकांनी हातात टमरेल घेऊन थेट महानगरपालिका मुख्यालयात धडक दिली. शौचालय मिळत नसेल तर महानगरपालिकेचे शौचालय वापरणार, अशी आंदोलक महिलांनी भूमिका घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. या आंदोलनात वसई तालुका सचिव दिलीप लोंढे, विरार शहर प्रमुख विद्या गिराणे, ज्येष्ठ कार्यकर्ते कमलाकर हरवटे आणि संघटनेच्या महिला सहभागी होत्या.
संघटनेच्या कार्याध्यक्षा ॲड. स्नेहा दुबे-पंडित यांनी रविवारी (ता. १९) वसई, विरार, नालासोपारा येथील आदिवासी पाड्यांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी पाणी, शौचालय यासारख्या गंभीर समस्या तेथील महिलांनी मांडल्या होत्या. त्यावर, आपला हक्क मिळवायचा असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे आवाहन स्नेहा दुबे यांनी केले होते. प्रशासनाला जाग आणण्यासाठी ‘टमरेल’ आंदोलन करण्याबाबत महिलांना प्रोत्साहित केले होते.
----------------------
१५ दिवसांत शौचालय बांधून देणार
विरार शहरातील राणी तलाव, फुलपाडा, कातकरी पाडा तसेच जाधव पाडा या आदिवासी पाड्यांमध्ये नागरिकांना स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. जी स्वच्छ्तागृहे आहेत त्यांची दुरवस्था झाल्याने महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत अनेकवेळा तक्रारी विनंती करूनदेखील प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून महिलांनी अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांना निवेदन देण्यात आले. १५ दिवसांत शौचालय बांधून देणार, असे आश्वासन या वेळी मोर्चाला अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी दिले. मात्र १५ दिवसांत काम झाले नाही तर दररोज महापालिकेच्या मुख्यालयात शौचासाठी येणार असल्याचे आंदोलकांनी जाहीर केले आहे.