
विवाहबाह्य संबधातून पत्नीची हत्या
ठाणे, ता. २० (वार्ताहर) : किसननगरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची कोयत्याने हत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यामध्ये पतीला सोडून प्रियकरासोबत राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्येनंतर रक्ताने माखलेल्या कपड्यात आरोपी गणेश प्रभाकर ठाकूर (वय ३५) याने पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. श्रीनगर पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक करून न्यायालयात नेण्यात आले. यामध्ये मृत महिला सुनीता कांबळे (वय ३४) हिचा विवाह झाला होता; मात्र ती नवऱ्याला सोडून गणेश ठाकूर याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. गणेश अविवाहित होता. दरम्यान, सुनीताच्या चारित्र्यावर गणेश संशय घेत असल्यामुळे या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. सुनीता हिने श्रीनगर पोलिस ठाण्यात गणेशविरोधात दारू पिऊन मारहाण करीत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. रविवारी या दोघांच्या झालेल्या भांडणात गणेशने कोयत्याने सुनीताच्या डोक्यात आणि कपाळावर वार केले. हत्येनंतर रक्ताने माखलेल्या कपड्यांत गणेश हा घरातून तसाच बाहेर पडला. दरम्यान, पोलिस शोध घेत असतानाच त्याने थेट श्रीनगर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले.