
भिवंडी पालिकेचा ८९७ कोटीचा अर्थसंकल्प
भिवंडी, ता. २० (बातमीदार) : भिवंडी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ११ कोटी ६२ लाख शिल्लक दर्शवणारा ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपयांचा अर्थसंकल्प विभागप्रमुखांच्या प्रशासकीय समितीसमोर सन २०२२-२३ चे सुधारित व सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्य लेख व वित्त अधिकारी किरण तायडे, उपायुक्त मुख्यालय दीपक पुजारी, उपायुक्त दीपक झिंजाड, उपायुक्त प्रणाली घोंगे, सहायक आयुक्त (आरोग्य) प्रीती गाडे व सर्व विभागप्रमुख, पालिका अधिकारी उपस्थित होते.
डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीकरिता आवश्यक त्या लेखाशिर्षात पुनर्विनियोजन करून, सन २०२२-२३ चे सुधारित ८८७ कोटी ६४ लाख २० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे; तर २०२३-२४ मध्ये महापालिकेची अंदाजित प्रारंभिक शिल्लक रु. १७ कोटी १६ लाख ८५ हजार अपेक्षित धरून एकूण उत्पन्न प्रारंभिक शिलकेसह ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजार अपेक्षित धरून ११ कोटी ६२ लाख शिल्लकेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात विशेष करून मलनिःसारण प्रकल्पासाठी आवश्यक एसटीपी प्रकल्प कार्यान्वित करणे, शहरात स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनीची सुविधा उपलब्ध करून देणे, पालिकेचा ३० खाटांचा दवाखाना कार्यान्वित करणे, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची निगा, दुरुस्ती व सुशोभीकरण करणे, सिमेंट काँक्रीट रोड तयार करणे, अटल आनंद घन वन प्रकल्प, दिवंगत परशुराम धोंडू टावरे स्टेडियम क्रीडासंकुलन सुशोभीकरण करणे, मनपा शाळा इमारती बळकटीकरण करणे व बेंचेस पुरवणे, दिवंगत मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचे नूतनीकरण करणे, या आणि इतर योजना या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये आहेत.