
पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा योजना रखडली
बोर्डी, ता. २१ (बातमीदार) : बोर्डी गावासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा ही योजना रखडली आहे. त्यामुळे शेकडो ग्राहक पैसे भरूनही गेली तीन वर्षे जोडणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ग्राहक इच्छुक असूनही त्यांना गॅसजोडण्या मिळत नसल्यामुळे योजना बासनात गुंडाळण्यात आली काय, प्रश्न विचारला जात आहे.
२०१५ मध्ये बोर्डी ग्रामपंचायत क्षेत्राच्या सुमारे आठ हजार लोकवस्ती असलेल्या या गावासाठी प्रायोगिक तत्त्वावर गॅस जोडण्या देण्याकरिता गुजरात गॅस कंपनीला ठेका देण्यात आला आहे. त्यानुसार गुजरात गॅस कंपनी बोर्डी ग्रामपंचायतीकडे पुढील कारवाईसाठी ग्रामसभेचा ठराव मागितल्याप्रमाणे ऑगस्ट २०१५ मध्ये ग्रामसभेत ठराव करून कंपनीने गावातील इच्छुक गॅस ग्राहकांना गॅसपुरवठा करावा, यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार तातडीने काम सुरू करून २०१८मध्ये भूमिगत गॅसवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर गुजरात गॅस कंपनीने गावातील ग्रामस्थांना गॅस जोडण्या घेण्यासाठी आवाहन केले होते.
सुरुवातीला पाच हजार ६५० रुपये अनामत रक्कम भरून गॅसजोडण्या घेण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र नंतर ग्रामस्थांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन कंपनीने अनामत रक्कम भरण्यात सवलत देऊन गॅस जोडण्यात येण्याचे काम सुरू केल्यानंतर शेकडो ग्राहकांनी जोडण्या मिळवण्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद दिला. मार्च २०२० पर्यंत गावातील काही भागांमध्ये जोडण्या देण्यात आल्या त्यानंतर २० मार्च २०२० रोजी लॉकडाऊन झाल्यामुळे काम थांबवण्यात आले त्यानंतर ते आज तयागत सुरू झालेले नाही. गॅस जोडण्या मिळवण्यासाठी शेकडे लोकांनी अनामत रक्कम भरूनही मार्च २०२३ उजाडले असताना जोडण्या मिळालेल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. गुजरात गॅस कंपनीच्या टोल फ्री नंबरवर याविषयी तक्रार केली असता या भागात काम करण्यासाठी टेंडर काढण्यात येणार असून लवकरच तुम्हाला जोडण्या देण्यात येतील, असे ढोबळ आश्वासन मिळते; मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने प्रतीक्षेत असलेले गॅस ग्राहक संभ्रमावस्थेत सापडले आहेत.