कचरा प्रक्रियेसाठी ४६ कोटी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा प्रक्रियेसाठी ४६ कोटी मंजूर
कचरा प्रक्रियेसाठी ४६ कोटी मंजूर

कचरा प्रक्रियेसाठी ४६ कोटी मंजूर

sakal_logo
By

विरार, ता. २१ (बातमीदार) : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतून दररोज ६०० ते ७०० टन इतका जमा होणारा कचरा साठवण्यासाठी महापालिकेचे भोयदापाडा येथे एकमेव डम्पिंग ग्राऊंड आहे. या ठिकाणी १५ लाख मेट्रिक टन इतका कचरा जमा झाला आहे. या डम्पिंग ग्राऊंडवर जमा होणारा कचरा व त्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने शासनाकडे निधी मागितला होता. त्या निधीला शासनाने हिरवा कंदील दाखवल्याने आता कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामाला वेग येणार आहे.
कचरा व्यवस्थापनाबाबत महापालिका प्रशासनाकडे निधी नसल्याने पालिकेने शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्याला शासनाने प्रतिसाद देत पालिकेला साडेदहा लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ४६.९६ करोड रुपयाचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित साडेचार लाख मेट्रिक टन कचऱ्यावर पालिकेने स्वनिधीतून प्रक्रिया करायची आहे. वसईच्या प्रदूषणाचा आलेख वाढत असल्याची दखल घेत या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला १०० कोटींहून अधिकचा दंड ठोठावला आहे; तर या दंडाची प्रतिदिन १० लाख रुपयांप्रमाणे वसुली करण्याचे आदेश लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिले आहेत. दिवसेंदिवस भोयदापाडा येथील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न जटील बनत असताना आता पालिकेला शासनाने आशेचा किरण दाखवून निधी मंजूर केल्याने येत्या काही महिन्यात कचऱ्यावर जलद गतीने प्रक्रिया होऊन येथील प्रश्न सुटणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

===========
कचराभूमीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आम्ही शासनाकडे निधी मागितला होता. त्यापैकी साडेदहा लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. उर्वरित साडेचार लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी ही आम्ही मागणी केली आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका