सांडपाण्याच्या समस्यांवर अखेर तोडगा

सांडपाण्याच्या समस्यांवर अखेर तोडगा

खारघर, ता. २१ (बातमीदार) : पनवेल महापालिका प्रशासनाने मलनिःसारण वाहिन्यांच्या साफसफाईसाठी नऊ कोटी रुपये खर्च करून १० हजार ५०० लिटर क्षमतेच्या दोन अद्ययावत रिसायकलर सिवर सक्शन कम जेटिंग मशीन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे पालिका क्षेत्रातील मलनिःसारण वाहिन्यांशी निगडित विविध समस्यांवर अखेर तोडगा निघाला आहे.
तळोजा सेक्टर ११ वसाहतीमधील सागर विहार, मेट्रो, ड्रीम सिटी, मनोमई, मनोरमा व इतर काही सोसायट्यांच्या परिसरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या मलनिःसारण वाहिन्या तुंबल्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. तसेच खारघरच्या प्रवेशद्वारावर असलेल्या हिरानंदानी पुलाजवळदेखील नुकतीच ही समस्या उद्‍भवली होती. त्यामुळे पालिका क्षेत्रातील रहिवाशांना अनेकदा मलमिश्रित पाणी पिण्याची वेळ आली होती. विशेष म्हणजे उद्‍भवणाऱ्या या समस्येसाठी पालिकेला कुळगाव बदलापूर नगर परिषद किंवा मुंबई पालिकेच्या टायगर जेटिंग मशीनचा वापर करावा लागत होता. त्यामुळे महापालिकेने मलनि:सारण वाहिन्यांच्या दैनंदिन साफसफाईसाठी उच्च क्षमतेच्या दोन जेटिंग मशीन घेतल्या आहेत.
-----------------------------
पाण्यावर पुनर्प्रक्रियेची व्यवस्था
हायड्रोडायनामिक क्लोनिंगच्या तत्त्वावर काम करणाऱ्या या जेटिंग सिस्टीमद्वारे सीवर आणि ड्रेनेजच्या पाण्याच्या वाहिन्यांची साफसफाई करण्याची क्षमता आहे. तसेच वाहनाच्या टाकीतील जमा झालेल्या गाळाची विल्हेवाट इच्छित स्थळी नेऊन गुरुत्वाकर्षण, प्रेशर डिस्चार्जद्वारे केली जाणार आहे. तसेच खराब पाण्यावर पुनर्प्रक्रियेची व्यवस्थाही या वाहनांमध्ये आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
------------------------
तळोजा सेक्टर अकरा वसाहतीमध्ये सांडपाण्याची समस्या निर्माण झाली होती. गटारात गाळ, दगड, सिमेंटच्या गोण्या अडकल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण झाली होती. यासाठी बाहेरून यंत्रणा आणावी लागली होती. त्यामुळे पालिकेने दोन अद्ययावत रिसायकलर सिवर सक्शन कम जेटिंग मशीन खरेदी केल्या आहेत.
- प्रीतम पाटील, एसटीपी प्रमुख, पनवेल महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com