ठाण्याच्या दीपचा दुहेरीत दमदार स्मॅश

ठाण्याच्या दीपचा दुहेरीत दमदार स्मॅश

ठाणे, ता. २१ : ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या दीप रांभियाने पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी करून ठाण्याचे आणि ठाणे बॅडमिंटन अकादमीचे नाव उज्ज्वल केले आहे. आंतरराज्य व वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्याने अक्षन शेट्टी याच्या साथीने पुरुषांच्या दुहेरीत रौप्यपदक पटकावले.

नुकत्याच बालेवाडी क्रीडासंकुल, पुणे येथे पार पडलेल्या मानाच्या आंतरराज्य व वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत भारतातील सर्वोत्तम आणि क्रमवारीत अव्वल असणाऱ्या बॅडमिंटनपटूंचा समावेश होता. सुमारे ५० लाख इतकी एकूण बक्षीस रक्कम असणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्याचा मानदेखील दीपला मिळाला. राष्ट्रीय क्रमवारीत पुरुष दुहेरीत अव्वल स्थानावर झेप घेणाऱ्या दीपने या स्पर्धेतदेखील छाप पाडली. पहिल्या सामन्यापासूनच त्याने व त्याचा जोडीदार अक्षन शेट्टी याने दमदार खेळीने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर प्रभुत्व मिळवण्यास सुरुवात केली.

सुरुवातीच्या फेरीमध्ये दीप व अक्षन या जोडीने शुभम पटेल आणि वेदांत शर्मा या जोडीचा २१-७, २१-८ असा पराभव केला आणि पुढील फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या लढतीत विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या नवीन पी. आणि लोकेश व्ही. यांना दीप आणि अक्षनने दीर्घकाळ चाललेल्या लढतीत २१-७, २३-२५, २१-९ असे नमवून अंतिम फेरीतील जागा निश्चित केली, परंतु अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत त्यांना हार पत्करावी लागली व रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

चोहोबाजूंनी कौतुकांचा वर्षाव
राष्ट्रीय स्तरावरील दीपच्या कामगिरीसाठी त्याचे चोहोबाजूंनी कौतुक होत आहे. या विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर तसेच क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com