
अवकाळीने तारांबळ
घणसोली / नवीन पनवेल, ता. २१ (बातमीदार)ः विजेच्या गडगडाटासह मंगळवारी (ता. २१) पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे नवी मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले; तर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपले असताना आता राज्यात मुंबई तसेच ठाणे, नवी मुंबईसारख्या उपनगरांमध्ये मंगळवारी पहाटे पावसाने हजेरी लावली होती. जोरदार वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. या वेळी नवी मुंबईतील गावठाणांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले; तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांचेदेखील नुकसान झाले आहे. या वेळी घणसोली परिसरातील रस्त्यावर झाडे कोसळल्याने सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांची चांगलीच दमछाक पाहायला मिळाली; तर अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गटारांचे पाणी तुंबल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. घणसोलीतील दत्तनगर, नवघर आळी अर्जुनवाडी, घणसोली पाम बीच रोड परिसरात रस्त्यावर पाणी जमा झाले होते; तर घणसोली रेल्वे स्थानक परिसरात पदपथांवर पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले.
------------------------------------------
विद्यार्थ्यांसह पालकांची धांदल
पनवेल परिसरात सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली होती. रस्त्यावर पाणी साचल्याने सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांसह त्यांच्या पालकांचीही धावपळ झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांनी आडोशाला उभे राहून बचाव करताना दिसून आले; तर काहीजणांनी उड्डाणपुलाखाली बचावासाठी आश्रय घेतला होता. पनवेलसह वसाहतीमधील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनांचा वेग मंदावल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडीलाही नागरिकांना सामोरे जावे लागले.
-------------------------------------
वाहतूक व्यवस्थेला फटका
मुख्य नाके आणि चौकांमध्ये वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. अनेकांना शाळा आणि कार्यालय वेळेत गाठता आले नाही. कळंबोली कार्मेल, सेंट जोसेफ हायस्कूल परिसरात स्कूल व्हॅनच्या रांगा लागल्या होत्या. छत्र्या आणि रेनकोट नसल्याने अनेकांना भिजतच जावे लागले. साधारण आठनंतर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने रस्ते जलमय झाले होते.
----------------------------------------
ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांच्या रांगा
ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकांसमोरील मुकुंद उड्डाणपुलाखाली सकाळच्या वेळी पावसामुळे पाणी साचून तळे झाले होते. या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडत होती. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाशीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ऐरोली येथील रिलायबल प्लाझापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती; तर ठाणेकडून वाशीकडे जाणाऱ्या मार्गावरील कळवा उड्डाण पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.