
एमआयडीसीमध्ये रस्त्यावरच पार्किंग
वाशी, ता. २१ (बातमीदार)ः मुंबई, ठाणे शहराप्रमाणेच सुविधांनी परिपूर्ण शहर म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली आहे. दिघा, रबाळे, महापे, तुर्भे, नेरूळ या औद्योगिक पट्ट्यात शेकडो कंपन्या आल्या आहेत, पण मूलभूत सुविधांबरोबरच पार्किंगच्या भेडसावणाऱ्या समस्येमुळे यातील बहुतांश कंपन्यांनी आता गुजरात, पंजाब राज्यांकडे मोर्चा वळवला आहे.
दिघा रामनगरपासून ते नेरूळ एलपी अशा डोंगरच्या कुशीत वसलेल्या २० किलोमीटरच्या औद्योगिक परिसराचा १९६० च्या दशकात झपाट्याने विकास झाला. स्थानिक भूमिपुत्रांना आपल्या जमिनी या औद्योगिक पट्ट्यासाठी दिल्या आहेत. औद्योगिक पट्ट्याची निर्मिती होत असताना कंपनी नियमाप्रमाणे अंतर्गत परिसरातच मूलभूत सुविधा व वाहन पार्किंगचे नियोजन करणे गरजेचे होते; मात्र कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी कंपनी आवारात व्यवस्था केली असल्याने अवजड वाहनांना रस्त्यावरच प्रतीक्षा करावी लागत आहे. अशातच एमआयडीसीचा विस्तार होत असताना ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि कल्याणकडे जाण्यासाठी तुर्भे, महापे असा अंतर्गत रस्ता निर्माण करण्यात आला आहे, पण औद्योगिक पट्ट्याच्या किनारी लोकवस्तीत असलेल्या अतिक्रमणामुळे पार्किंगचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे.
------------------------------------------
राखीव भूखंडावर डेब्रिजचे ढीग
औद्योगिक परिक्षेत्रातील रबाळे, तुर्भे, दिद्या येथील ग्रीन वर्ल्ड इमारतीच्या मागे बारा हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड पार्किंगसाठी आरक्षित ठेवण्यात आला होता; मात्र एमआयडीसीने हा भूखंड हस्तांतरित करून उद्योजकांना विकला आहे. त्याऐवजी आता यादव नगर परिसरामध्ये पार्किंगसाठी भूखंड राखीव ठेवला आहे, पण येथेही आता डेब्रिजचे ढीग उभे राहिले आहेत.
---------------------------------------------
एकात्मिक विकास प्रकल्पात दुर्लक्ष
१९६० च्या दशकात औद्योगिक पट्टा निर्माण झाल्यानंतर तब्बल ५० वर्षांनी नवी मुंबई महापालिकेने एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत ११०० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे दीर्घकालीन पुनर्निर्माण केले आहे; मात्र असे होत असताना पार्किंगसाठी पर्यायी जागादेखील सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्या रस्त्यावर मनमानी पद्धतीने पार्किंग सुरू केले आहे.
-------------------------------
एमआयडीसी परिसरात कंपनीसमोर वाहने पार्क केली जातात. अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने त्याला टोईंग करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे.
- गोपाळ कोळी, वाहतूक निरीक्षक, रबाळे