
चारकोपमध्ये नववर्षानिमित्त भव्य मिरवणूक
कांदिवली, ता. २१ (बातमीदार) ः चारकोपमध्ये नववर्षाच्या मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात ४६ संस्थांचा समावेश असणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून मराठी नववर्षानिमित्त ही मिरवणूक काढण्यात येते. नववर्ष स्वागत समितीच्या वतीने याचे आयोजन करण्यात येते. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन सनिल अंकम यांनी केले आहे.
सकाळी ७ वाजता चारकोप मार्केट येथे सर्व यात्राप्रेमी उपस्थित राहतील. या वेळी पारंपरिक, संतांच्या वेशभूषेतील नागरिक, बालक व युवक यात्रेत सहभागी होणार आहेत. ढोल ताशा पथक, महिला व तरुणांची लेझीम पथके, १००हून अधिक फेटेधारी दुचाकीस्वार आणि चौकात मल्लखांब प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. तुळजाभवानी आणि विठ्ठलाचा देखावा उभारण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नववर्ष स्वागत समिती, चारकोपच्या वतीने करण्यात आले आहे.