
आंबेडकर रायटर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर
धारावी, ता. २१ (बातमीदार) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी बाबूराव बागूल, डॉ. म. ना. वानखेडे आणि म. भि. चिटणीस यांच्या स्मरणार्थ साहित्य, सामाजिक क्षेत्रांमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार कॉ. शरद पाटील (मरणोत्तर), प्रा. अविनाश डोळस (मरणोत्तर) आणि साधना साप्ताहिकाला देण्यात येत आहे. रविवारी (ता. २६) हा कार्यक्रम होईल.
पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवा इंगोले असणार आहेत; तर काँग्रेसचे नेते हुसैन दलवाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात हा कार्यक्रम पार पडेल. या वेळी प्रा. डॉ. प्रकाश खरात, नागपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी नागरिकांनी अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती असोसिएशनचे सचिव ॲड. नाना अहिरे यांनी केली आहे.