स्वागतयात्रांचा अपूर्व उत्‍साह

स्वागतयात्रांचा अपूर्व उत्‍साह

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : कोरोनाच्या कालखंडानंतर यंदा प्रचंड उत्साहात डोंबिवली शहरात नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश मंदिर संस्थानचे यावर्षी शंभरावे वर्ष आहे. नववर्ष स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने स्वागतयात्रेचा उत्साह अधिक आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, नियोजित कार्यक्रम देखील पार पडत आहेत. मंगळवारी पहाटे झालेल्या पावसामुळे नववर्ष स्वागतयात्रेवर देखील पावसाचे मळभ आहे. पाऊस आला तरी तेवढ्याच उत्साहात स्वागतयात्रा मोठ्या उत्साहात पार पडेल, तशी तयारी देखील करण्यात आली असल्याची माहिती श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी विविध जाती, प्रांत, धर्माच्या ग्रामस्थांना एका व्यासपीठावर आणावे, या विचारातून डोंबिवलीत पहिली नववर्ष स्वागत यात्रा सुरू केली. गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीतून निघणाऱ्या या स्वागतयात्रेची पुढे प्रथाच पडली. या नववर्ष स्वागतयात्रेचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा स्वागत यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
-----------
मुख्यमंत्र्यांची उपस्‍थिती
गणेश मंदिर संस्थानतर्फे गेल्या आठवडाभरापासून विविध सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या यात्रेत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, विविध सिनेकलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. उद्या नववर्ष स्वागत यात्रा असल्याने डोंबिवली फडके रोड परिसरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. स्टेज उभारण्याचे देखील काम सुरू आहे.
-----------------
दरम्यान, मंगळवारी अवकाळी पावसाने कल्याण-डोंबिवलीत जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे गणेश मंदिराच्या आवरातील मोठी रांगोळीही खराब झाली. त्यामुळे अवकाळी पावसाचे नववर्ष स्वागत यात्रेवर देखील मळभ साचले आहे.
-------------------------------
स्‍वागतयात्रेची तयारी पूर्ण
उद्या देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नववर्ष स्वागत यात्रेवर पावसाचे सावट असणार आहे. मात्र, स्वागतयात्रेसाठी नागरिकांमध्ये उत्साह आहे. स्वागत यात्रेची तयारी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे जरी उद्या पाऊस पडला तरी स्वागतयात्रा त्याच जल्लोषात, उत्साहात निघणार, असे गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्त सुहास आंबेकर यांनी सांगितले.
--------------------
स्वागतयात्रा मार्गांवर राजकीय फलकबाजी
डोंबिवलीमधील स्वागत यात्रेच्या मार्गांवर आणि शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय मंडळींनी फलकबाजी आणि कमानी उभ्या केल्या आहेत. फलकबाजी करण्यात भाजप आणि शिवसेना पक्षात चढाओढ दिसून येत आहे. शिवसेना-भाजपच्या चढाओढीतून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वागतयात्रेच्या माध्यमातून लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी केला असल्याची चर्चा आहे.
---------------------------------------------
ठाण्यातही जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : मराठी नववर्षनिमित्ताने ठाण्यातील कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे स्वागत यात्रा काढण्यात येते. त्यानुसार कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्येही अशा यात्रा काढण्यात येतात. यामध्ये नागरिक पारंपरिक वेशभूषा करून सहभागी होतात. तसेच या यात्रांच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही अशाचप्रकारे स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले असून, ठाणे आणि डोंबिवलीतील यात्रांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजेरी लावणार आहेत.
बुधवारी सकाळी ७ वाजता श्रीकौपिनेश्वर पालखीचे पारंपारिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होणार आहे. प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी व इतर पादचारी जांभळी नाका-रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे, आराधना सिनेमा, हरी निवास चौक, गोखले रोड पर्यंत येईल. पुढे राममारुती मार्ग, पु. ना. गाडगीळ चौक, तलाव पाळी मार्गे पुन्हा श्री कौपिनेश्वर मंदिरात येईल. मंदिरात आरती व प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. या स्वागत यात्रेत ६५ चित्ररथ सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com