शिक्षण आरोग्यासह स्वच्छतेच्या संकल्पाची गुढी

शिक्षण आरोग्यासह स्वच्छतेच्या संकल्पाची गुढी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प शहरातील सर्वसामान्य नागरिकाला केंद्रित ठेवून तयार केला असून, नागरिकांना आवश्‍‍यक शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या मुलभूत बाबींचा त्‍यामध्‍ये समावेश आहे. महापालिका क्षेत्रात सीबीएससीच्या शाळा सुरू करण्यासह इंग्रजी माध्यमांच्या नवीन शाळा, मराठी माध्यमांच्या शाळांचे सक्षमीकरण, प्रसुतिगृहांचे बळकटीकरण यासह पार्किंग प्लाझा येथे मल्‍टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. पालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम देखील हाती घेण्यात येणार आहे. या सर्व बाबींच्‍या समावेशामुळे यंदाचा अर्थसंकल्प शिक्षण, आरोग्यासह स्वच्छतेच्या संकल्पाची गुढी असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापालिकेच्‍या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्‍यात आलेली नाही. महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यासह स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी असलेला हा अर्थसंकल्प आहे. यानुसार ठाणे महापालिकेमार्फत सीबीएससी शाळा सुरू करण्‍याचे नियोजन आहे. सीबीएससी हा राष्ट्रीय स्तरावरील बोर्ड असून, सद्या ठाणे शहरात सीबीएससी बोर्डमधून शिक्षण घेण्यासाठी प्रामुख्याने फक्त खासगी शाळांचाच पर्याय उपलब्ध आहे. सीबीएससी अभ्यासक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी असून, त्या माध्यमातून मुलांचा बौध्दिक विकास प्रभावीपणे होणे शक्य होते.
----------------------------
विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्‍यावर भर
सद्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकता यावे, याकरीता पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेणे पसंत करतात. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या नवीन शाळा सुरू करणे प्रस्तावित आहे. इंग्रजी शाळा सुरू करताना मराठी माध्यमातील शाळांचे बळकटीकरण करणे देखील महत्त्वाचे आहे. सद्या मराठी शाळा बंद होत चालल्‍याने ज्या मराठी शाळा महापालिका चालवित आहेत, तेथील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्‍यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहेत. शाळा दुरुस्ती करतांना मुलभूत सुविधा देण्यावर भर देण्यात येणार असून, त्यामध्ये कोणत्याही शाळेत गळती असू नये व उत्तम दर्जाचे शौचालय असेल याबाबत दक्षता घेतली जाणार आहे.
--------------
गर्भवतींची विशेष काळजी
ठाणे महापालिका क्षेत्रात ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना’ राबविण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. गर्भधारणेची माहिती घेऊन गर्भवतीची १२ आठवड्याच्या आत नोंदणी केल्यास तसेच गर्भवतीच्‍या प्रसुतीची नोंद घेतल्यास रक्तक्षय असणाऱ्या गर्भवतींना भेटी देऊन त्यांची हिमोग्लोबीनची पातळी योग्य प्रमाणात राखणे व जोखमीच्या मातांना आवश्यक सेवा देऊन गर्भधारणेची निष्पती सुदृढ बालक व सुदृढ माता असल्यास या करीता कामावर आधारित अतिरिक्त मोबदला महापालिकेतर्फे आशा स्वयंसेविकांना देण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
-------------
नागरिकांचे आरोग्य ‘सुदृढ’
कोपरी येथे प्रसुतीगृहांतर्गत १८ खाटांचे नवजात शिशु कक्ष तयार करून ज्या नवजात शिशुंचे जन्मतः वजन कमी आहे किंवा ज्या नवजात शिशुंना उपचारांची आवश्यकता आहे त्यांचेवर एसएनसीयुद्वारे आवश्यक उपचार करण्यात येतील. पार्किंग प्लाझा येथे कोरोना रुग्णांवर उपचार करण्याकरिता ठाणे पालिकेचे ११०० खाटांचे डीसीएच सुरू केले होते व त्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या आहेत. हे ठिकाण शहरातील मध्यवर्ती भागात असल्याने नागरिकांसाठी वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत सोईचे आहे. महापालिका हद्दीत ४२ ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू आहेत.
-----------------------------
रुग्‍णालयांमध्‍ये सुसज्‍ज सुविधा
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील रुग्णसेवा सुधारण्‍यासाठी रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या वॉर्डमधील वापर क्षमता १०० टक्‍क्‍यापेक्षा जास्त आहे अशा वॉर्डमध्ये बेडची संख्या वाढविणे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे नियोजित आहे. टप्‍प्याटप्प्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची क्षमता ५०० बेडवरुन १००० बेडपर्यंत वाढविण्‍याचे नियोजन आहे.
-----------------------
शौचालयांची पुनर्बांधणी
ठाणे महापालिका परिक्षेत्रात एकूण ९१५ शौचालये असून, या अंतर्गत १२,७१० सीट्सची संख्या आहे. नव्‍या आर्थिक वर्षात ७६२ शौचालयांच्‍या पुनर्बांधणीकरीता ८१ कोटीचे नियोजन केलेले आहे. यामध्ये ६९२ शौचालयांचे नूतनीकरण करणे व ७० शौचालयांच्या पुनर्बांधणीची कामे हाती घेतली आहेत. शहरातील सामुदायिक, सार्वजनिक शौचालय २४ तास स्वच्छ राहण्‍याकरीता आवश्यक स्थापत्य व विद्युत कामे करून घेण्यात येत आहेत. प्रत्येक शौचालयावर ओव्हरहेड टँक बसवून २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
..............................
अर्थसंकल्पातील उद्दिष्टे :
१. कोणतीही करवाढ व दरवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प
२.महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर
३. खर्चामध्ये वित्तीय शिस्त
४. अनावश्यक महसुली खर्चात कपात
५. स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या त्रिसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी
६. भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन
७. प्रशासकीय कामकाजामध्ये सुधारणा
८. प्राप्त अनुदानातील कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन
९. कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष
.................................
खर्च बाजू
२०२२-२३ मध्ये पूर्ण झालेले प्रकल्प
१) कळवा खाडीवरील पुलाच्या पाच मार्गिका
२) खारेगाव रेल्वे क्रॉसिंगवरील पूल
३) १०० खाटांचे कौसा रुग्णालय
४) पातलीपाडा एस.टी.पी. (५९ एम.एल.डी.)
५) आठ जलकुंभ व एक जीएसआर
६) प्रदुषणविरहित विजेवरील २३ बस व सीएनजी इंधनावरील २० बस एकूण ४३ बस
७) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील नवा प्रसुती कक्ष व शस्त्रक्रिया विभाग
८) स्मार्ट सिटी योजनेतील गावदेवी भूमिगत वाहनतळ
९) स्मार्ट सिटी योजनेतील कोलशेत साकेत बाळकुम, कळवा शास्त्रीनगर ते कोपरी खाडी किनारा सुशोभीकरण
------------------------------
दायित्वाचा भार कायम
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावर कोरोनाकाळात झालेल्या परिणामामुळे उत्पन्न आणि खर्चाचे गणित गडगडले होते. त्यामुळे या काळात पालिकेवर दायीत्वाची रक्कम वाढत होती. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, ठाणे परिवहन उपक्रमाच्या अनुदानाचा वाढता भार आणि जुन्या विकासकामांची देयके अदा करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिकेवर गेल्यावर्षी २७४२ कोटी रुपयांचे दायित्व होते. त्यापैकी ५६२ कोटींचे दायित्व कमी झाले असले तरी पालिकेवर २१८० कोटीचे दायित्व आजही कायम असल्याचे चित्र आहे.
...................................
शहर विकास विभागाच्‍या उत्पन्नात घट
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर बांधकाम क्षेत्राला उभारणी देण्यासाठी राज्य सरकारने अधिमूल्य शुल्कामध्ये सवलत दिली होती. याचा लाभ घेतल्यामुळे पालिकेच्या तिजोरीत हजार कोटींच्या आसपास महसूल जमा झाला होता. परंतु, या काळात बांधकाम व्यावसायिकांनी तीन वर्षांच्या काळातील बांधकाम प्रकल्पांचे प्रस्ताव दाखल करून त्यास मंजुरी घेतली. त्यामुळे गेल्यावर्षी प्रकल्प कमी दाखल झाल्याने शहर विकास विभागाचे उत्पन्न घटले असून, या विभागाला विविध करापोटी ३८७ कोटीचे उत्पन्न मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com