
मिठाचा हंगाम लांबणार
विरार, ता. २१ (बातमीदार) : मंगळवारी (ता. २१) पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे मीरा रोडपासून डहाणूपर्यंत असलेल्या मिठागरांना मोठा फटका बसला आहे. मिठागरांच्या बांधावर असलेले मीठ पावसात वाहून गेले आहे. दुसऱ्या बाजूला मीठासाठी तयार केलेल्या कोंड्यातील तापमानात फरक पडल्याने त्याचा फटका मीठ हंगामाला बसणार आहे. मीरा रोड ते डहाणू दरम्यान मोठ्या प्रमाणात मिठागरे असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होत असते. मीठ उत्पादनाचा खरा हंगाम हा फेब्रुवारीपासून सुरू होतो. या दरम्यान मीठ उत्पादनासाठी कोंडी (वाफे) तयार करून त्यात पाणी सोडले जाते. त्या पाण्याचे तापमान ( डिग्री) उन्हाने वाढत असते. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात मिठाचे उत्पादन सुरू होते; परंतु मंगळवारी पडलेल्या अवकाळी पावसाने मीठ उत्पादकांना फटका बसला आहे. मिठागरांच्या बांधावर असलेले मीठ वाहून गेले आहे. तर कोंडीत (वाफे) तयार झालेले तापमान कमी झाल्याने मीठ उत्पादनाचा हंगामही पुढे जाणार असून त्याचा फटका मात्र मीठ उत्पादकांना बसणार आहे.