
पाच कोटींचा महसूल जमा
विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : विक्रमगड तहसीलदार कार्यालयाकडून सामान्य महसूल व अधिकृतरीत्या परवान्यातील गौण खनिजाचा चार कोटी ३० लाख ९९ हजार रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. तसेच जमीन महसूल ६५ लाख ४० हजार आणि गौण खनिज दंड म्हणून तीन लाख ८३ हजार ४३५ रुपये असा जवळपास पाच कोटी २२ हजार रुपये महसूल रक्कम वसुली करून शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे.
विक्रमगड तालुक्यात महसूल विभागाकडून महसूल व गौण खनिजांच्या अवैध धंद्याविरुद्ध सतर्कतेची मोहीम राबवण्यात आली आहे. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या टिमने डांबर, खडी व इतर गौण खनिज चोरट्या वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून १ एप्रिल २०२२ ते १० मार्च २०२३ पर्यंत गौण खनिज दंड वसूली तीन लाख ८३ हजार ४३५ रुपये जमा करण्यात आली आहे. गौण खनिज रॉयल्टी परवानगी काढलेली जमा रक्कम चार कोटी ३० लाख ९९ हजार व जमीन महसूल ६५ लाख ४० हजार जमा करण्यात आली आहे.
--------------
१ एप्रिल २०२२ ते १० मार्च २०२३ पर्यंत जमा रक्कम
• अधिकृत गौण खनिज - चार कोटी ३० लाख ९९ हजार
• जमीन महसूल - ६५ लाख ४० हजार
• गौण खनिज दंडवसुली - तीन लाख ८३ हजार ४३५ रुपये