
मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
मनोर, ता. २१ (बातमीदार) : जॉगिंगसाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता. २०) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. मनोरच्या वेळगाव रस्त्यावरील खुशी आंगन भागात मधमाश्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किरण चंपानेकर (वय ६१) यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ते मनोर ग्रामपंचायतीच्या सदस्या स्वप्नाली चंपानेकर यांचे पती होते. मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जॉगिंगसाठी ते घराबाहेर पडले होते. खुशी आंगन कॉम्प्लेक्सजवळ ते पोहोचले असता मधमाश्यांच्या समूहाने त्यांच्यावर हल्ला चढवला. मधमाश्यांनी त्यांच्या शरीरावर डंख मारण्यास सुरुवात केल्यानंतर चंपानेकर यांनी धावण्यास सुरुवात केली, परंतु मधमाश्यांनी त्यांचा पाठलाग करीत डंख मारणे सुरूच ठेवले. काही वेळाने ते जमिनीवर कोसळले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.