
दापचरीमध्ये पाणी समस्या बिकट
कासा, ता. २२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील दापचरी दुग्ध प्रकल्पातील शेकडो कुटुंबांना सध्या पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनेक दिवसांपासून दुग्ध प्रकल्पातील विद्युत जनित्र बंद असल्याने प्रकल्पातील नागरिकांना पाण्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
अनेक वर्षांपासून दापचरी दुग्ध प्रकल्प अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. या दुग्ध प्रकल्पामध्ये अजूनही अनेक शेतकरी आपला व्यवसाय करीत आहेत; पण वीज आणि पाणीसमस्येने हैराण झाले आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न तयार गंभीर झाला आहे. या दुग्ध प्रकल्पात सध्या दोनशेपेक्षा अधिक कुटुंबे राहत असून येथील दुग्ध प्रकल्पाचे कार्यालय पालघर येथे हलवल्याने मोठी गैरसोय होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील वीजसमस्या सुटत नसल्याने पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यासाठी शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
---------------------
दापचरी दुग्ध प्रकल्पातील वीज समस्या मोठी आहे. अनेक दिवसांपासून जनित्र खराब असून केबल जळाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी महावितरणकडे तक्रार केली आहे. लवकरच तो प्रश्न सुटेल.
- हेमंत गडवे, दापचरी प्रकल्प अधिकारी
-------------------------
अनेक वर्षांपासून दुग्ध प्रकल्पातील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. महावितरणचे जनित्र खराब होणे, केबल जळणे यामुळे या भागात नेहमी वीज खंडीत होत राहते. वीज नसल्यामळे पाणीपुरवठा नीट होत नाही. ग्रामस्थांनी वर्गणी काढून अनेक वेळा येथील समस्या सोडवल्या आहेत. आता या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात.
- सुरेश महाजन, ग्रामस्थ, दापचरी