बुलेट ट्रेनला लवकरच सुरुवात

बुलेट ट्रेनला लवकरच सुरुवात

मनोर, ता. २२ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या महाराष्ट्रातील कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून बुलेट ट्रेनच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक संकुल निर्मितीसाठी पहिले कंत्राट देण्यात आले आहे. मेघा इंजिनीयरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनला संयुक्तरीत्या हे कंत्राट देण्यात आले आहे.

मुंबईमध्ये हाय-स्पीड रेल्वे स्थानकांची रचना आणि बांधकामाशी संबंधित कामासाठी करार करण्यात आला आहे. हे मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या (बुलेट ट्रेन) कामाचे महाराष्ट्र राज्यातील पहिले कंत्राट असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या वतीने देण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक संकुलाच्या निर्मितीसाठी तीन हजार ६८१ कोटी रुपये रकमेचे कंत्राट असून ४.८५ हेक्टर क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. तसेच स्थानक संकुलाचे काम ५४ महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकात सहा फलाट असतील आणि प्रत्येक फलाटाची लांबी अंदाजे ४१५ मीटर असेल. ही लांबी १६ डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी पुरेशी आहे. या बुलेट ट्रेनच्या स्थानकाला मेट्रो आणि रस्तामार्गे जोडले जाणार आहे.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील स्थानक मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्थानक आहे. स्थानकाचा प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे २४ मीटर खोलीवर नियोजित आहे. बुलेट ट्रेनच्या स्थानकाच्या कॉम्प्लेक्समध्ये प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर मिळून तीन मजले असणार आहेत. मुंबई मेट्रो लाईनवरील जवळचे मेट्रो स्थानक आणि एमटीएनएलच्या इमारतीकडे जाण्यासाठी दोन प्रवेश तसेच बाहेर पडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
----
२९ मार्चपासून निविदा
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात बुलेट ट्रेनच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. नुकतेच पालघर, ठाणे जिल्ह्यासह मुंबईमधील भूसंपादनाचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स सी- १, बोगदा असलेला भाग सी- २ आणि पालघर जिल्ह्याचा भाग सी- ३ मध्ये येतो. येत्या २९ मार्चपासून पालघर जिल्ह्यातील कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू केल्या जाणार असल्याची माहिती नॅशनल हाय स्पीड कॉर्पोरेशनच्या जनसंपर्क अधिकारी सुषमा गौर यांनी दिली.

--
प्रवाशांसाठी नियोजित सुविधा
सुरक्षा यंत्रणा, तिकीट खिडकी, प्रतीक्षा क्षेत्र, बिझनेस क्लास लाऊंज, नर्सरी, विश्रांती कक्ष, स्मोकिंग रूम, माहिती कियॉस्क आणि प्रासंगिक रिटेल, सार्वजनिक माहिती आणि घोषणा प्रणाली, सीसी टीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. याशिवाय मेट्रो, बस, ऑटो आणि टॅक्सीसारख्या वाहतुकीच्या सेवांचे या ठिकाणी एकीकरण करण्याचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com