
अल्पवयीन मुलीला चटके देणारे आई-वडिल अटकेत
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : सीबीडी परिसरात राहणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीला तिच्याच आई-वडिलांनी अमानुषपणे मारहाण करून तिच्या पायावर चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीबीडी पोलिसांनी या घटनेतील पीडित मुलीच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेतील पीडित मुलीला गेल्या काही महिन्यांपासून या मुलीलीचे आई-वडील अमानुषपणे मारहाण करत होते. गतरविवारी रात्रीदेखील या मुलीच्या आई-वडिलांनी तिला बेदम मारहाण केली. तसेच तिच्या आईने मुलीच्या डाव्या पायावर चटके दिले. त्यामुळे तिच्या पायावर भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. या मारहाणीची माहिती परिसरातील जागरुक नागरिकांनी नवी मुंबई युवा चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सीबीडी पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करत आई वडिलांना पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले आहे. सतत मारहाण होत असल्याने मुलीने आपल्या आई वडिलांसह राहण्यास नकार दिल्याने पोलिसांनी ठाणे येथील बाल कल्याण समितीसमोर पीडित मुलीला हजर केले आहे. त्यानुसार बाल कल्याण समितीने या पीडित मुलीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.