
आंबा, चिकू, भाजीपाल्याला अवकाळीचा फटका
अंबरनाथ, ता. २१ (बातमीदार) : मागील काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यात ढगाळ वातावरण आणि १९ व २१ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, चिकू, भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील आंबा पिकाचा मोहोर पूर्णपणे झडला असून, पावसामुळे ९० टक्के फळे गळून पडली आहेत. शिल्लक राहिलेल्या आंबा पिकावरही बुरशीजन्य रोग वाढून त्या फळांचे नुकसान होईल, अशी शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
चिकू पिकांची ही फळगळती होऊन नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागामार्फत नुकसान झालेल्या पिकांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. वारा आणि पावसामुळे टोमॅटो, वांगी, काकडी या भाज्यांचे नुकसान झाले आहे. अंबरनाथ तालुक्यातील सर्वसाधारणपणे ३०० हेक्टर आंबा आणि ५० हेक्टर भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.